आरोग्य विभागाला रिक्तपदांचा आजार
By Admin | Updated: July 9, 2014 00:08 IST2014-07-08T23:49:43+5:302014-07-09T00:08:20+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल ९ प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागाला रिक्तपदांचा आजार
हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल ९ प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या आरोग्य विभागाकडे शासनाने गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्याशी संबंधित विविध विभागातील पदे सातत्याने रिक्त राहत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील अतिरिक्त आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहाय्यक संचालक कृष्टरोग या तब्बल ९ अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे करण्यात आली; परंतु शासनस्तरावरून त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या पदाचा पदभार अन्य अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळत आहेत. परिणामी या पदाला व या कार्यालयांतर्गत येणाऱ्या कामांना न्याय देता येईनासा झाला आहे. जिल्हा परिषदेतील अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तर साथरोग अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. हे पद भरले गेले नसल्याने निर्माण होणाऱ्या साथरोगांवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ निर्णय होत नाही. परिणामी अनेक वेळा जनतेच्या जीवाला धोका निर्माण होतो; परंतु शासन मात्र याकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
आरोग्य राज्यमंत्र्यांकडून अपेक्षा
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन रिक्त पदे त्वरीत भरण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री फौजिया खान जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या; परंतु त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घातले नव्हते.
आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या तब्बल ९ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जनतेला समाधानकारक सेवा मिळेना.
रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज.