आरोग्य विभाग खडबडून जागा
By Admin | Updated: November 4, 2014 01:36 IST2014-11-04T00:38:19+5:302014-11-04T01:36:58+5:30
अंबड : अंबड तालुक्यात डेंग्युसह साथ रोगांच्या थैमानाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.

आरोग्य विभाग खडबडून जागा
अंबड : अंबड तालुक्यात डेंग्युसह साथ रोगांच्या थैमानाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.एस. भटकर जातीने लक्ष देत असून बुधवार ५ नोव्हेंबर रोजी अंबड पंचायत समिती सभागृहात भटकर यांच्यासह जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामसेवकांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.
तालुक्यात डेंग्यूसह साथ रोगांनी अक्षरश: थैमान घातले आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून साथ रोगांच्या वाढत्या प्रसाराने नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यात मागील महिन्यात भीमा पुंड (३०), मिलींद बिन्नीवाले (१६), अनिता मुळे (८), गणेश देविदास जराड (२२), संभाजी शिंदे (१८), आवेश बागवान (१८), सुदाम आरसुळ (१३), ऋषी खाडे (५) आदींसह अनेक रुग्ण डेंग्यूने बाधित झाले आहेत. यापैकी अनेकांवर सध्या अंबड, जालना व औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या नियोजन शुन्य काराभारामुळे सामान्य नागरिकांना नाहक मानसिक , शारीरिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. डेंग्यूने बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करताना २० हजारांपासून ६० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. एवढया मोठया प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसून रुग्णांस शारीरिक कष्ट सहन करावे लागतात ते वेगळेच. (वार्ताहर)