आरोग्य विभागास उशिरा आली जाग

By Admin | Updated: September 7, 2014 00:28 IST2014-09-07T00:27:01+5:302014-09-07T00:28:09+5:30

हिंगोली : मराठवाड्यात डेंग्यूने सर्वत्र थैमान घातल्यानंतरही हिंगोलीतील आरोग्य विभागाला जाग आली नाही.

The Health Department came late | आरोग्य विभागास उशिरा आली जाग

आरोग्य विभागास उशिरा आली जाग

हिंगोली : मराठवाड्यात डेंग्यूने सर्वत्र थैमान घातल्यानंतरही हिंगोलीतील आरोग्य विभागाला जाग आली नाही. पिंपळदरीत एकाचा बळी गेल्यानंतर आता येथे पथक तळ ठोकून आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मात्र कायम वास्तव्यावर नाहीत.
औंढा तालुक्यातील पिंपळदरी आरोग्य केंद्रास रात्रीला कोणा वाली नसते. दिवसा उशिरा अधिकारी केंद्रात दाखल होतात. शहरातून ये-जा करीत असल्यामुळे आधीच ग्रामस्थांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. यापूर्वीच ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. तरीही आरोग्य विभागाची झोप गेली नव्हती. जिल्ह्यात सर्वत्र हा प्रकार होत असताना आरोग्य विभागाला त्याचे देणे, घेणे नाही. पिंपळदरीत कित्येक दिवसांपासून आरोग्य सेवकाने गावात फेरफटकाही मारलेला नाही. परिणामी लवकर हा आजार समोर आला नाही. फैलाव वाढत गेल्यानंतर तीव्र रूप धारण केले. दरम्यान, याच गावातील विलास ज्ञानेश्वर डुकरे आणि प्रतिभा संजय घोंघडे हिस ताप आला. दोघांनाही परभणी येथील खाजगी रूग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले. त्यांनाही डेंग्यूची लक्षणे आढळल्याचे समोर आले. मात्र आरोग्य विभाग हा खासगी रिपोर्ट खरा मानण्यास तयार नाही. दहा दिवसानंतर ५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते आणि औंढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी पिंपळदरीला भेट दिली. त्यानंतर आरोग्य विभाग गतिमान झाला.
आजाराचे कारण
एडिस इजिप्टाय नावाचा डास चावल्यास हा आजार होतो. विषाणूजन्य असलेला हा आजार कोणालाही होऊ शकतो. तो लहान मुलांना अधिक होते. प्रामुख्याने हा डास दिवसा चावतो. या आजाराचा काळ ५ ते ७ दिवस असतो. थांबलेल्या स्वच्छ पाण्यावर हे डास वाढतात. घरातील व परिसरातील भांडी, टाकी, टाकाऊ वस्तूत साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डास होतात. (प्रतिनिधी)
आजाराची लक्षणे
अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यामागे दुखणे, तीव्र आजारात भूक मंदावते, मळमळणे, पोटदुखी, जोराने डोके दुखने, थंडी वाजणे, उलटी होणे, गंभीर आजार जडल्यास तोंडातून रक्त येणे, त्वचेवर पुरळ येतात.
घरात पाणी जमा होऊ देऊ नका, कूलर, पाण्याची टाकी, पक्ष्यांना पिण्याचे पाणी, फ्रीज, भांडे, टायर, फेकून दिलेले शहाळ्यातील पाणी नियमित अंतराने उपसा. कोरडा दिवस पाळा, डास प्रतिबंधक क्रीम किवा फवारणी करा. या रुग्णांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, ताप ३९ डिग्रीच्या खाली राहण्यासाठी तापप्रतिबंधक औषधी घ्यावे, अंग ओल्या कपड्याने पुसून घ्यावे, शरीरातील पाणी कमी होण्यासाठी फळाचा रस, ओआरएसचे द्रावण घ्यावे.

Web Title: The Health Department came late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.