जिल्ह्यात आरोग्य केंद्रेच ‘आजारी’..!
By Admin | Updated: December 11, 2014 00:43 IST2014-12-11T00:03:08+5:302014-12-11T00:43:37+5:30
संजय तिपाले, बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाची ‘डोकेदुखी’ समस्या निर्माण झालेली असतानाच असुविधेचा ‘तापा’ ने डोके वर काढले आहे़

जिल्ह्यात आरोग्य केंद्रेच ‘आजारी’..!
संजय तिपाले, बीड
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाची ‘डोकेदुखी’ समस्या निर्माण झालेली असतानाच असुविधेचा ‘तापा’ ने डोके वर काढले आहे़ ३४ ठिकाणच्या केंद्रांमध्ये दुरुस्तीकामे वर्षानुवर्षे रखडलेलीच आहेत़ रुग्णांचे आजार दूर करण्यासाठी बांधलेल्या केंद्रांनाच विविध समस्यांच्या ‘आजारां’नी घेरले ेआहे़ त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़
जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्यामार्फत ग्रामीण भागातील रहिवाशांच्या आरोग्याची देखभाल घेतली जाते़ स्त्री जन्माचा घसरलेला टक्का, माता व बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याने बीडचा समावेश ‘हायफोकस’मध्ये केलेला आहे़ मात्र, ‘हायफोकस’मधील जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा कोलमडलेलीच आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९ तर आरोग्यसेवकांची ७० पदे रिक्त आहेत़ तोकड्या मनुष्यबळावर कारभार सुरु असतानाच आता नवीच समस्या ‘आ’ वासून उभी आहे़
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे़ शिवाय काही ठिकाणी आरोग्य केंद्रांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. काही केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांमध्ये असुविधा आहेत. या सर्व कामांची दुरुस्ती रखडलेली आहे.
आराखडा तयार
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार केलेला आहे.
एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत केवळ किरकोळ दुरुस्त्या करणे गरजेचे आहे. सध्या आरोग्य विभागाकडे निधी शिल्लक नाही. त्यामुळे सीईओंमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्तांसह संचालकांना निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. निधी येताच कामे पूर्ण केले जातील,असेही ते म्हणाले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. मात्र, बहुतांश अधिकारी मुख्यालयी न थांबता ‘अप- डाऊ न’ करतात. मुख्यालयी बांधलेल्या निवास्थस्थानांमधील असुविधेचा मुद्दा तर वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ‘कळी’चाच ठरला आहे. असुविधा असल्याचे सांगून अनेक अधिकारी मुख्यालयी राहण्याचे टाळत असल्याचे पहावयास मिळत आहे.