‘मुख्यालय दिनी’ही अधिकारी गैरहजर

By Admin | Updated: May 12, 2015 00:54 IST2015-05-12T00:34:12+5:302015-05-12T00:54:48+5:30

सुनील घोडके , खुलताबाद सोमवार हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबण्याचा दिवस.

'Headquarters day' also officer absentee | ‘मुख्यालय दिनी’ही अधिकारी गैरहजर

‘मुख्यालय दिनी’ही अधिकारी गैरहजर


सुनील घोडके , खुलताबाद
सोमवार हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबण्याचा दिवस. मात्र, खुलताबादमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग व लघु पाटबंधारे स्थानिक स्तर कार्यालयातील सर्वांनीच या नियमाला हरताळ फासला
आहे. दुपारी साडेबारा वाजता ‘लोकमत’ प्रतिनिधीने विविध कार्यालयात पाहणी केली
असता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात फक्त शिपाई हजर होता, तर अधिकाऱ्यांच्या दालनाचे कुलूप कायम होते. लघु पाटबंधारे कार्यालयातही हीच अवस्था होती.
खुलताबाद तालुका औरंगाबादच्या जवळ असल्याने जवळपास सर्वच कर्मचारी अप-डाऊन करतात. याची माहिती अगदी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत आहे; परंतु कारवाई होत नसल्याने कोणालाही भीती राहिलेली
नाही.
लघु पाटबंधारे कार्यालयात दुपारी एकपर्यंत अधिकारी हजर नव्हते. शिपाई व एक लिपिक तेवढे कार्यालयात होते.
भूमिअभिलेख, वनविभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचारी होते; परंतु वरिष्ठ अधिकारी मात्र कार्यालयाकडे फिरकलेही नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. मुख्यालयी दिनीही अधिकारी कार्यालयात न सापडल्याने आलेल्या लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
खुलताबाद तालुक्याचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. तहसीलदार सचिन घागरे रजेवर गेल्याने नायब तहसीलदार प्रशांत काळे यांच्याकडे अतिरिक्त भार आहे. न.प.च्या मुख्याधिकारी सविता हारकर याही रजेवर असल्याने काळे यांच्याकडेच अतिरिक्त भार आहे.
४तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर बदली झाल्याने गंगापूरच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी हे पदही वर्षभरापासून रिक्त आहे. हे पद लिपिक जी.जी. थोरात सांभाळतात.
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात एकमेव शिपाई हजर होता. तोही अधिकारी नसल्याने चक्क झोप काढत होता. यामुळे आलेल्या लोकांना अधिकारी नेमके कुठे आहेत, याची माहितीही मिळत नव्हती.
औरंगाबाद येथे सुभेदारी विश्रामगृहात बैठक असल्याने औरंगाबादलाच थांबलो आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मंजूर अहेमद यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: 'Headquarters day' also officer absentee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.