पाचोड : पैठण तालुक्यातील चिंचाळा शिवारातील विहिरीत मुंडके नसलेल्या एका वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ९ वाजता आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस (वय ६०, रा. चिंचाळा, ता. पैठण, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ब्रह्मराक्षस हे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते आपल्या गावी राहण्यासाठी आले. त्यांची चिंचाळा शिवारात गट नंबर १२१ मध्ये शेती आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्याच शेतातील विहिरीत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पैठणचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पाचोडचे स.पो.नि. शरदचंद्र रोडगे पाटील, जमादार किशोर शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर हा मृतदेह ब्रह्मराक्षस यांचाच असल्याचे समोर आले. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.