विभागप्रमुखांचे ‘करार’ मोडीत
By Admin | Updated: August 25, 2014 00:23 IST2014-08-25T00:20:05+5:302014-08-25T00:23:12+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील विभागांमध्ये सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे.

विभागप्रमुखांचे ‘करार’ मोडीत
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये परस्पर विनापरवाना सामंजस्य करार करण्याची सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे.
महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. काळे यांनी कामकाजाची पद्धत समजावून घेतली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, विद्यापीठातील अनेक शैक्षणिक विभागांमध्ये व्यवस्थापन परिषदेची पूर्वपरवानगी न घेताच काही उद्योग, स्वायत्त संस्था, खाजगी संस्थांसोबत सामंजस्य करार केले जातात. बहुतांशी विभागांत झालेले करार हे निव्वळ प्रासंगिक ठरलेले आहेत. विद्यापीठात होणाऱ्या सामंजस्य कराराबाबत एकवाक्यता असावी, या हेतूने ‘बीसीयूडी’च्या संचालकांनी एक परिपत्रकच काढले असून ते कुलसचिव, विद्यापीठाचे उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे संचालक व सर्व विभागांना जारी केले आहे.
विद्यापीठ कायद्यान्वये विद्यापीठ, महाविद्यालये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिसंस्था, वैज्ञानिक, औद्योगिक, वाणिज्य संघटना यांच्यामध्ये सहयोग वृद्धिंगत करण्यासाठी तसेच त्याला चालना देण्यासाठी ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांनाच अधिकार असेल. कलम १७ (७) अन्वये विद्यापीठ प्राधिकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून कुलसचिव यांना विद्यापीठाच्या वतीने करार करण्याच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असेल.
सामंजस्य करार करण्यासंदर्भात विद्यापीठात ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीे. समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे २ सदस्य, दोन विभागांतील प्राध्यापक व विद्याशाखेचा अधिष्ठाता यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागाने समितीच्या शिफारशी व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय परस्पर कसलाही सामंजस्य करार करू नये. विनापरवानगी करार केल्यानंतर एखादा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल.