जीवन-मृत्यूच्या रेसमध्ये तो जिंकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:27 IST2017-11-06T00:27:01+5:302017-11-06T00:27:04+5:30
जीवन-मरणाच्या स्पर्धेत तरुणाने मृत्यूवर विजय मिळविला. ही घटना बीड बायपास रोडवरील बाळापूर फाट्याजवळ पहाटे ३.३० वाजच्या सुमारास घडली.

जीवन-मृत्यूच्या रेसमध्ये तो जिंकला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रस्त्यावरील लघु पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव कंटेनर सरळ कठड्याला धडकला. या भीषण अपघातात कंटेनरचा समोरच्या भागाचा चुराडा होऊन दोन जण जखमी झाले. यातील एक जण मात्र कठडा आणि कंटेनरमध्ये अडकून पडला. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कटरने पत्रा कापून आणि क्रेनच्या साहाय्याने कंटेनर उचलून त्यास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. जीवन-मरणाच्या स्पर्धेत तरुणाने मृत्यूवर विजय मिळविला. ही घटना बीड बायपास रोडवरील बाळापूर फाट्याजवळ पहाटे ३.३० वाजच्या सुमारास घडली.
अनिल हरी हराडे (२०, रा. बलसूर, ता. उमरगा, जि. लातूर) असे जखमी चालकाचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जखमी अनिल हराडे हा वाहनचालक आहे. तो कंटेनरमध्ये मैदा घेऊन धुळे जिल्ह्यातील अमळनेर येथून अनंतापूरकडे (मध्यप्रदेश) जात होता. त्याच्यासोबत आणखी एक चालक आणि क्लीनर होता. रात्रभर अनिल गाडी चालवीत असल्याने औरंगाबादच्या बीड बायपासमार्गे पुढे जात असताना त्याला झोपेची डुलकी लागली आणि त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. यावेळी बाळापूर फाट्याजवळील पुलाच्या क ठड्याला कंटेनर धडकून अडकला. या अपघातात अनिलशेजारी बसलेला दाऊद इस्माईल डांगे, किरकोळ जखमी झाला, तर क्लीनरला कोणतीही दुखापत झाली नाही. कंटेनरच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आणि चालक अनिल याच्या पोटात स्टेअरिंग घुसले आणि हा कमेरेपासून खालीचा भाग कंटेनरच्या केबिनमध्ये अडकला. त्याला जागेवरून हालचालही करताना प्रचंड वेदना होत. पहाटे साडेतीन-चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सीताराम केदारे आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांना शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी पत्रा कापणा-यास आणि क्रेनचालकास घटनास्थळी बोलावून घेतले. चार तासांच्या प्रयत्नानंतर कंटेनरच्या केबिनचा पत्रा कापल्यानंतर जखमी अनिलला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्यास बाहेर काढण्यासाठी मदत केली. यानंतर चालकाला घाटी रुग्णालयात दाखल केले.