्रग्रामीणभाग झाला निवडणूकमय!
By Admin | Updated: October 9, 2014 00:36 IST2014-10-09T00:12:21+5:302014-10-09T00:36:42+5:30
जालना : सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या अलिशान लक्झरी गाड्या... त्यातून कडक खादीत वावरणारे पुढारी व कार्यकर्ते... त्यांच्या स्वागतासह

्रग्रामीणभाग झाला निवडणूकमय!
जालना : सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या अलिशान लक्झरी गाड्या... त्यातून कडक खादीत वावरणारे पुढारी व कार्यकर्ते... त्यांच्या स्वागतासह जल्लोषात बेफान झालेले स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते...चावडीवरील कॉर्नर सभा... त्यातील आरोप-प्रत्यारोप व एकेरी भाषा... अन् धुराडे उडवीत जाणारे ताफे असे हे ग्रामीण भागातील चित्र.
लोकसभा निवडणुकीपासूनच ग्रामीण भाग निवडणूकमय झाला आहे. कारण त्या निवडणुकीतील प्रचारयुध्दा पाठोपाठ जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यांनी जय-पराजयाची विश्लेषने करीत तातडीने मोर्चेबांधणी सुरु केली. आळस झटकून हे मातब्बर प्रचार दौऱ्यावर गुंतले. विशेषत: सत्तारुढ असो की विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी संभाव्य आचारसंहिता ओळखून आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकरीता कार्यक्रमांचा धुमधडाका सुरु केला. भूमीपूजने, उद्घाटने, लोकार्पण सोहळे रंगू लागले. एकाका दिवशी किमान अर्धा डझन कार्यक्रमांची कार्यक्षेत्रात रेलचेल होती. निवडणुकीचा कार्यक्रम पाठोपाठ आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कार्यक्रमांचा तो धुमधडाकाथांबला खरा, परंतू तेथून प्रचाराचा धुराडा उडाला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्तीप्रदर्शनांपासून ते आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यांपर्यंत खेडोपाडी, वाडीतांडे या प्रचार युध्दाने अक्षरश: गजबजून गेली आहेत. मातब्बर मंडळींनी गेल्या चार महिन्यांपासून तर निवडणुक रिंगणात नव्याने उतरलेल्या नवख्यांनी गेल्या आठ पंधरा दिवसांतच सर्व शक्तीनिशी ग्रामीण भागात धुराडा उडविला आहे. महायुती व आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच दुरंगी लढती चौरंगी किंवा बहुरंगी झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील त्या-त्या पक्षांच्या अडगळीत पडलेल्या स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आता सुगीचे दिवस आले आहेत. तेथूनच ते कपड्यांवरील धुळ झटकून कामास जुंपले. ते आजपर्यंत. येत्या आठ दिवसात तर हे कार्यकर्ते त्या-त्या गावांमधून प्रचाराचा कळस गाठतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. तालुका स्थानापासून खेडीपाडी व वाडीतांड्यांवर सद्यस्थितीत वॉर्डनिहाय गाठीभेटी, कॉर्नर सभा, बैठकांना उत आला आहे. गल्ली बोळातून ध्वनीक्षेपकावरुन कर्नकर्कश प्रचार करणाऱ्या अॅटोरिक्षा, जीपगाड्या धुमाकूळ घालत आहेत. फाट्यांवरील छोट्या मोठ्या हॉटेल्स, ढाबे गजबजून गेले आहेत. जावे त्या ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा रंगली आहे. ओट्या-ओट्यांवर, कट्ट्यांवर रात्री बेरात्रीपर्यंत उमेदवारांनी केलेल्या युक्त्या, क्लुप्त्या व खेळलेल्या डावपेचांच्याच गप्पा रंगल्या आहेत. त्यामुळे वातावरण बदलून गेले आहे. येत्या आठ दिवसात वातावरण पेटेल. (प्रतिनिधी)