त्यांनी एकटीनेच केली एव्हरेस्ट बेस कॅम्पची सफर

By Admin | Updated: May 10, 2016 00:53 IST2016-05-10T00:41:58+5:302016-05-10T00:53:55+5:30

औरंगाबाद : आज एका गावाहून दुसऱ्या गावी एकटीने प्रवास करायला अनेक महिला बिचकतात. अशा वेळी आपल्या शहरातील एक महिला गिर्यारोहक चक्क नेपाळ येथील

He made the journey of Everest Base Camp alone | त्यांनी एकटीनेच केली एव्हरेस्ट बेस कॅम्पची सफर

त्यांनी एकटीनेच केली एव्हरेस्ट बेस कॅम्पची सफर

औरंगाबाद : आज एका गावाहून दुसऱ्या गावी एकटीने प्रवास करायला अनेक महिला बिचकतात. अशा वेळी आपल्या शहरातील एक महिला गिर्यारोहक चक्क नेपाळ येथील एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जाऊन उणे १० डिग्री तापमानात एक तास गायन करून आली. एकटीनेच केलेला त्यांचा हा प्रवास भल्याभल्यांना अचंबित करणारा आहे. शीतल बंग असे या धाडसी महिलेचे नाव आहे.
शीतल यांना लहानपणापासूनच गिरीभ्रमंतीची आवड आहे. दोन वर्षांपूर्वी परिचयातील एक व्यक्ती एव्हरेस्ट सर करून आल्याचे समजताच त्यांच्या मनात एव्हरेस्ट सर करण्याबद्दल नवी ऊर्मी निर्माण झाली.
हनुमान टेकडीसारख्या लहानसहान टेकड्यांपासून त्यांनी गिरीभ्रमणाचा (ट्रेकिंगचा) अनुभव गाठीशी बांधायला सुरुवात केली. मागील वर्षी कळसूबाई शिखर येथील गिरीभ्रमण त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आणि तेव्हापासून तयारी सुरू झाली एव्हरेस्टची. कोणत्याही गिर्यारोहक चमूसोबत त्यांच्या वेळा न जुळल्याने शीतल यांनी एकटीनेच जाण्याचा निर्णय घेतला. दि.१८ एप्रिल ते ३ मे या काळात त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प ५,३०० मीटर हा ट्रेक १४ दिवसांत जाऊन-येऊन पूर्ण केला.
काठमांडूवरून प्रवास करीत त्या दि.२५ ला रात्री बेसकॅम्पला पोहोचल्या. दि.२६ रोजी त्यांच्या वाढदिवशी त्यांनी थंडीत उणे १० डिग्री तापमानात चक्क एक तास गायन केले. रामायणातील ५ वा अध्याय (सुंदरकांड) त्यांनी तेथे जमलेल्या अनेक गिर्यारोहकांना गाऊन दाखवला. फक्त ५० टक्केच आॅक्सिजन असणाऱ्या त्या भयानक थंडीत एक तास गायन करणे खरोखर महाकठीण होते. गायनानंतर त्यांनी तेथे ‘माहेश्वरी मंडळ, औरंगाबाद’चा फलक फडकावला आणि मोहीम फत्ते केली.
यासाठी त्यांना सुरेंद्र शेळके, शहरातील गिर्यारोहक रफिक शेख आदींचे मार्गदर्शन लाभले. पती महेश बंग यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच कुटुंबाच्या सहकार्यामुळे आपण ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडू शकल्याचे शीतल बंग यांनी सांगितले.

Web Title: He made the journey of Everest Base Camp alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.