‘देवदर्शनापूर्वीच आपण देवाघरी जाऊ’ याची त्यांना कल्पना नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:02 IST2021-08-22T04:02:17+5:302021-08-22T04:02:17+5:30
कन्नड : श्रावण महिना असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा बेत शहरातील काही ...

‘देवदर्शनापूर्वीच आपण देवाघरी जाऊ’ याची त्यांना कल्पना नव्हती
कन्नड : श्रावण महिना असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा बेत शहरातील काही तरुणांनी आखला. मोठ्या भक्तिभावाने ते निघालेही मात्र, हे देवदर्शन आपल्यापैकी काहींना थेट देवाघरी नेईल, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. धुळे जिल्ह्यात त्यांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात यातील तीन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
शहरातील हिवरखेडा रोडवरील गर्जे कॉम्प्लेक्समध्ये एक फायनान्स कार्यालय असून, ते महिला बचत गटांना कर्जपुरवठा करते. याच कार्यालयात नोकरीला असलेले पवन विजय जाधव (२३, सरस्वती कॉलनी), गणेश हिरे (रा. शांतीनगर), सचिन राठोड (२४, रा. आदर्श वसाहत, उंबरखेडा), शिवाजी जाधव (२७), नवनाथ बोरसे (२७), समाधान पाटील (२३) यांनी श्रावण महिना असल्याने मध्य प्रदेशातील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघाले होतेण यासाठी त्यांनी शहरातीलच कार (क्र. एमएच २२ यू ७१२८) किरायाने घेतली. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते रवाना झाले. रात्री १ वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील सोनगीर फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात पवन जाधव, गणेश हिरे व सचिन राठोड हे तिघे ठार झाले, तर शिवाजी जाधव, नवनाथ बोरसे, समाधान पाटील व कारचालक गौरव कांबळे (३५) हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर धुळे येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
चौकट
सचिन राठोडचे चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
शनिवारची सकाळ कन्नड शहरात अपघाताचे वृत्त घेऊनच उजाडली. अपघात कसा झाला आणि नेमके किती जण मयत झाले याची, जो तो चौकशी करीत होता व जशी माहिती मिळेल तसे सांगत होता. अपघातात ठार झालेल्या सचिन राठोड याचे लग्न चार महिन्यांपूर्वीच झाले होते, तर इतर दोघे हे अविवाहित होते. सचिनच्या पश्चात पत्नी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे, तर गणेश हिरे याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व पवन जाधवच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
फोटो :