बायजीपुऱ्यात घर फोडून दहा लाखांचा माल पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:22+5:302021-01-13T04:09:22+5:30
याविषयी सूत्राने सांगितले की, बायजीपुरा येथील एका जणाचे मुलगा आणि सुनेसोबत भांडण झाल्यावर ते ३ जानेवारी रोजी सहपरिवार ...

बायजीपुऱ्यात घर फोडून दहा लाखांचा माल पळविला
याविषयी सूत्राने सांगितले की, बायजीपुरा येथील एका जणाचे मुलगा आणि सुनेसोबत भांडण झाल्यावर ते ३ जानेवारी रोजी सहपरिवार बीड येथे गेले. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडून सुमारे दीड लाख रुपये रोख आणि १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ११ जानेवारी रोजी रात्री हे कुटुंब घरी आले तेव्हा त्यांना ही घटना दिसली. या घटनेची माहिती त्यांनी लगेच जिन्सी पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, फौजदार दत्ता शेळके आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोनजण चोरी करताना आढळून आले. यात एक अल्पवयीन मुलगा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत. या चोरीमागे त्यांचा मित्र असलेला घरमालकाचा मुलगा असल्याचे सांगितले. ही बाब समजताच घरमालक हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याऐवजी बीड येथे निघून गेले. पोलीस अधिकारी त्यांना सकाळपासून तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात यावे आणि तुमच्या मुलाला सोबत घेऊन या, असे सांगितले. तेव्हा येतो असे सांगून त्यांनी फोन कट केला. आपला मुलगा या चोरीत असल्याचे आणि त्याने मित्राकडून घर फोडून घेतल्याचे समजल्याने घरमालक थक्क झाले. पोलिसांत तक्रार नोंदविली तर पोलीस मुलाला अटक करतील या भीतीपोटी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याचे टाळले आणि ते बीड येथे निघून गेले. १२ जानेवारी रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अनेक फोन केले. मात्र पोलिसांचे फोन त्यांनी घेतले नाही.