‘सेबी’ च्या कचाट्यात एचबीएन अडकली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:30 IST2015-05-06T00:22:48+5:302015-05-06T00:30:12+5:30
श्रीपाद सिमंतकर , उदगीर गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा न दिल्याने एचबीएन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़

‘सेबी’ च्या कचाट्यात एचबीएन अडकली !
श्रीपाद सिमंतकर , उदगीर
गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा न दिल्याने एचबीएन कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ त्यामुळे सेक्युरीटिज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडीया (सेबी) च्या मुंबई शाखेने रिजर्व बँक आॅफ इंडीयाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली़ यामध्ये एचबीएन कंपनीच्या संचालकांना चार वर्ष कंपनीचे व्यवहार थांबविण्यात यावे व गुंतवणूकदारांना त्वरीत परतावा द्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत़
एचबीएन डेअरीज अॅन्ड अलाईड लिमिटेड कंपनीचे संचालक हरमेंदर सिंग सरन, सतनाम सिंग सरन, अमनदिप सिंग सरन, गजराज सिंग चौहान, मंजीत कौर सरन, जसबीर कौर, राकेश कुमार तोमर, सुखदेव सिंग धिलौन व सुखजीत कौर यांना सेबी ने कंपनी संदर्भात सूचना केल्या़
१२ फेब्रुवारी २०१५ रोजी आदेश क्रमांकडब्लूटीएम/पीएस/७१/ सीआय एस-एनआरओ/ एफईबी/ २०१५ या सेबीने जारी केलेल्या आॅर्डर नुसार संचालकांनी ४ वर्षांकरीता कोणतीही योजना राबवू नये़ कोणत्याही योजनेअंतर्गत रक्कम गोळा करु नये़ तसेच ९ मार्च किंवा त्यापेक्षा १५ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांच्या थकीत रकमा अदा कराव्यात, असे निर्देश दिले़ मात्र त्यानुसार कंपनीने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही़
संबंधित विषयाची चौकशी करण्यासाठी सेबीच्या वेबसाईट व टोल फ्री नं़ १८००२२७५७५ या क्रमांकाशी संपर्क करुन सेबी आदेशाची खात्री करुन घेण्यात आली़ याठिकाणीही सेबीच्या आदेशासंदर्भात दुजोरा देण्यात आला़ अधिक माहितीसाठी मुंबई सेबी कार्यालयाशी संपर्क साधता येईल, असेही या माहितीत सांगण्यात आले़ एचबीएन कंपनीच्या दिल्ली मुख्यालयाशी त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ०११-४९६९१२०० क्रमांकावर संपर्क केला असता दूरध्वनी संपर्क होऊ शकला नाही़