विरूद्ध वारे सुटल्याने बळीराजा झाला ‘हवालदिल’
By Admin | Updated: June 13, 2014 00:33 IST2014-06-13T00:02:53+5:302014-06-13T00:33:56+5:30
शिरूर अनंतपाळ : मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पाच दिवस उलटले तरीही पावसाचे आगमन झाले नसून, दिवसेंदिवस जोरदार विरूद्ध वारे वाहत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़

विरूद्ध वारे सुटल्याने बळीराजा झाला ‘हवालदिल’
शिरूर अनंतपाळ : मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पाच दिवस उलटले तरीही पावसाचे आगमन झाले नसून, दिवसेंदिवस जोरदार विरूद्ध वारे वाहत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्याचे एकंदर क्षेत्र ३१ हजार ५०० हेक्टर्स असले तरीही लागवडीयोग्य क्षेत्र केवळ २८ हजार ५०० हेक्टर्स असून, त्यापैैकी २० हजार हेक्टर्समध्ये सोयाबीनची लागवड होणार असल्याचे सर्वेक्षण तालुका कृषी खात्याच्या वतीने करण्यात आले आहे़ लग्नसराई अद्यापि सुरु असल्याने मशागीची कामे यंत्राद्वारे करून खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत़
परंतु, मार्च महिन्यातील गारपीटीनंतर पुन्हा फारसा पाऊस झाला नाही़ त्यामुळे मशागतीची कामे करण्यासाठी कठीण जात आहे़
मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पाच दिवस उलटले आहेत़ तरीही पाऊस पाडण्यासाठी अनुकूल पेरण्या वेळेवर होतील की नाही, या भितीने शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ उन्हाची तीव्रता कायम असल्याने जलस्त्रोताची पाणी पातळी झपाट्याने खालावत चालली आहे़ तर दिवसेंदिवस विरूद्ध वाऱ्याचा जोर कायम सुरू आहे़ एकंदरच खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़ (वार्ताहर)
मान्सुनचे आगमन वेळेवर होईल, त्याचबरोबर १२ जूनपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आला होता़ परंतु, पाऊस तर पडला नाहीच शिवाय वातावरणातही बदल नाही़
सोयाबीनच्या राशी दरम्यान, गारपीट झाल्याने अनेकांचे सोयाबीन भिजले आहे़ त्यामुळे पेरणीसाठी बियाणे कसे उपलब्ध होईल याचीही काळजी लागली आहे़ परिणामी बियाणांचा तुटवडा शेतकऱ्यांना सतावत आहे़