हर्सूल तलावाने तळ गाठला!
By Admin | Updated: July 28, 2014 01:03 IST2014-07-28T00:48:35+5:302014-07-28T01:03:38+5:30
औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील ९ फूट पाणी आटले आहे. सध्या तलावात १० फूट पाणीसाठा असून पाण्याने तळ गाठला आहे.
हर्सूल तलावाने तळ गाठला!
औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील ९ फूट पाणी आटले आहे. सध्या तलावात १० फूट पाणीसाठा असून पाण्याने तळ गाठला आहे. गेल्या वर्षी दुष्काळात तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे. नोव्हेंबर २०१३ च्या अखेरीस तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
तलावातून दोन दिवसाआड ६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाणी घेण्याचा ताण थोड्याफार प्रमाणात कमी झाला. यामुळे मनपाची वीज, वेळ, पैसा वाचण्यास मदत झाली. २०१२ ते नोव्हेंबर २०१३ असा दीड ते दोन वर्षे हर्सूल तलावातून पाणीपुरवठा बंद होता.
दीड लाख लोकांना पाणी...
तलाव उंचावर असल्यामुळे दिल्लीगेटपर्यंत ४५० मि.मी. च्या आरसीसी जलवाहिनीतून ते पाणी आणले जाते. तेथे शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते पाणी दिल्लीगेट येथील जलकुंभात जाते. तेथून जुन्या शहरातील १६ वॉर्डांतील म्हणजेच सुमारे दीड लाख लोकांना त्याचे वितरण होत आहे.
महिनाभर पुरेल एवढे पाणी
तलावातील पाणी महिनाभर पुरू शकेल. जून महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. जुलै महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पाणीसाठ्यात काहीही भर पडलेली नाही. उपअभियंता आर.एन.संधा यांनी सांगितले, महिनाभर पाणी पुरेल. आणखी ३ फूट पाणी वापरणे शक्य आहे.
गढूळ पाण्याची शक्यता
तलावाने तळ गाठल्यामुळे ७ फुटांपासून पाणी उपसा सुरू झाल्यास गढूळ पाणीपुरवठा होऊ शकतो. ४ फुटांवर एक व्हॉल्व्ह आहे. त्यातून गाळ मोठ्या प्रमाणात शुद्धीकरण केंद्रावर येऊ शकतो. त्यामुळे रसायनांची मात्रा वाढवून पाणी शुद्ध करावे लागेल. असेही उपअभियंता संधा यांनी सांगितले.