हर्षवर्धन जाधवांनी पुकारले बंड
By Admin | Updated: July 20, 2016 00:30 IST2016-07-19T23:59:00+5:302016-07-20T00:30:27+5:30
कन्नड : कन्नड नगर परिषद निवडणुकीसाठीची पूर्वतयारी इतर राजकीय पक्षांनी सुरू केली असून, राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हर्षवर्धन जाधवांनी पुकारले बंड
कन्नड : कन्नड नगर परिषद निवडणुकीसाठीची पूर्वतयारी इतर राजकीय पक्षांनी सुरू केली असून, राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेची साधी बैठकही नाही. उमेदवार मात्र शिवसेनेकडे अपेक्षेने पाहत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी आपण विकासमहर्षी रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, या भूमिकेत तसूभरही बदल होणार नाही, असे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विकास आघाडीच्या स्थापनेबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेच्या वेळी व नगरसेवकपदाच्या आरक्षणाच्या वेळी प्रचंड उदासीनता दाखविल्यामुळे त्यांचे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक येईपर्यंत वेळकाढूपणा करायचा आणि नंतर चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप करून पुन्हा काँग्रेस पक्षाचीच सत्ता नगर परिषदेत आणण्यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
शिवसेना पक्षाचा अधिकृत आमदार म्हणून पक्ष वाढीसाठी मनापासून प्रयत्न करताना राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे केली. शहरात एकीकडे नगर परिषद अस्वच्छ पिण्याचे पाणी पुरवीत असताना स्वखर्चाने तब्बल १५ टँकरने शहरास पाणीपुरवठा केला. हिवरखेडा रस्त्याचे कामही सुरू आहे. शहरासाठी विकासकामे मंजूर करून आणलीत. मात्र, त्यासाठी नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यामुळे ही विकासकामे आठ महिने लांबणीवर पडली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कानउघाडणी झाल्यावर काही कामास नाहरकत मिळाले. मात्र, माळीवाड्याचे नाहरकत दिले नाही. त्यामुळे सरकारी निधी थांबवून स्वखर्चाने पाण्याच्या मोटारी बसविल्या. बसस्थानकावर स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडविला. या कामांमुळे नगर परिषदेवर भगवा फडकविण्याबाबत जनभावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.