उत्साहाची दिवाळी यंदा बेताचीच!
By Admin | Updated: October 23, 2014 00:15 IST2014-10-23T00:05:20+5:302014-10-23T00:15:13+5:30
औसा : मागील चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेती उत्पादनात घट झाली असल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर झालेला पहावयास मिळत आहे़

उत्साहाची दिवाळी यंदा बेताचीच!
औसा : मागील चार-पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेती उत्पादनात घट झाली असल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर झालेला पहावयास मिळत आहे़ सध्या दिवाळीनिमित्त बाजारपेठ गजबजली असली तरी बाजारात खरेदी मात्र बेताचीच होताना दिसतेय़् दिवाळीनिमित्ताने बाजारपेठेत वर्दळ वाढली तरीही ती किराणा दुकाने आणि कपड्यांची दुकानांत खरेदी मर्यादित होत आहे़
औसा तालुका हा तसा शेती व्यवसायावर असवलंबून असलेला तालुका आहे़ तालुक्यात शासकीय नोकरांची संख्या बऱ्यापैैकी असली तरीही नोकरदार मात्र लातूर व अन्य मोठ्या शहरात राहत असल्यामुळे तसेच राजकीय कार्यकर्तेही शहराच्या ठिकाणीच वास्तव्य करीत असल्याने औश्याच्या बाजारपेठेला तसा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचाच आधार आहे़ गेल्या चार-पाच वर्षापासून पावसाअभावी शेती व्यवसायच कोलमडून पडल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे़ शेती व्यवसायावरच ज्यांची उपजिविका अवलंबून आहे, असे शेतकरी तर संकटात सापडले आहेत़ अनेकांनी बैैलबारदाना मोडला़ शेती हिश्यावर अथवा पैश्याने दिली़ पण निसर्गाचं दुष्टचक्र काही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही़ यावर्षी तालुक्यात ६२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली़ एक तर पेरण्यांना झालेला एक महिन्याचा विलंब आणि त्यानंतरही पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात झालेली घट आणि पुन्हा बाजारात पडलेले भाव़ आता हाती आलेल्या सोयाबीनवरच वर्षभराची गुजराण करावी लागणार असल्यामुळे शेतकरी बेताचीच दिवाळी साजरी करताना दिसतोय़् बाजारपेठ जरी गजबजली असली तरी किराणा आणि कापड बाजारच बऱ्यापैैकी हालला आहे़ अन्य ठिकाणची खरेदी मात्र अभावानेच दिसतेय़ वास्तविक पहाता या सणानिमित्ताने मोठ्या प्रमाणात दरवर्षी खरेदी होत असते़ परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हात मोकळा सोडून खरेदी करीत नाहीत़ त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़ (वार्ताहर)