शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाल्याने‘आयुर्वेद’मध्ये खुशी, ‘ॲलोपॅथी’मध्ये गम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:17+5:302020-12-17T04:27:17+5:30
औरंगाबाद : आयुर्वेदाच्या डॉक्टरांना विविध ५८ शस्त्रक्रिया करण्याची नुकतीच परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे कमी दरात विशेषत: ग्रामीण भागांत ...

शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाल्याने‘आयुर्वेद’मध्ये खुशी, ‘ॲलोपॅथी’मध्ये गम
औरंगाबाद : आयुर्वेदाच्या डॉक्टरांना विविध ५८ शस्त्रक्रिया करण्याची नुकतीच परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे कमी दरात विशेषत: ग्रामीण भागांत शस्त्रक्रिया शक्य होणार असल्याने आयुर्वेद डॉक्टरांकडून आनंद व्यक्त होत आहे. परंतु अप्रशिक्षित डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया होऊन गुंतागुंत होऊन रुग्णांचे आरोग्य धोक्यात येईल, असे म्हणत ॲलोपॅथी डॉक्टरांनी या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने २० नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या राजपत्र अधिसूचनेद्वारे जनरल सर्जरी, यूरोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ईएनटी, नेत्ररोग व दंत चिकित्सा यांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदाच्या पदव्युत्तर वैद्यांना करण्याची मुभा दिलेली आहे. या निर्णयाला गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या प्रकारे ॲलोपॅथी डॉक्टरांकडून विरोध होत आहे. तर आयुर्वेद डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
आयुर्वेदिक डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागत
शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कमी पडतात. त्यामुळे नव्या निर्णयाचा रुग्णांना फायदा होईल. ग्रामीण भागात आयुर्वेद डॉक्टर अधिक आहेत. त्यामुळे कमी रकमेत रुग्णांवर शस्त्रक्रिया होतील. खेड्यापाड्यात चांगली आरोग्य सुविधा मिळेल.
-आयुर्वेदिक डॉ. जी. एस. कुलकर्णी, निमा, राज्य अध्यक्ष
-------
एमबीबीएस आणि बीएएमएस या अभ्यासक्रमांचा कालावधी सारखाच आहे. १०८ रुग्णवाहिकेवर ९० टक्के आयुर्वेद डॉक्टर आहेत. नव्या निर्णयामुळे कमी रकमेत शस्त्रक्रिया शक्य होतील. खेड्यातून शहरात येण्याची वेळ रुग्णांवर येणार नाही.
-आयुर्वेदिक डॉ. शिवकुमार गोरे, निमा, जिल्हाध्यक्ष
------
ग्रामीण भागात ॲलोपॅथी डॉक्टर जात नाहीत. तेथे आयुर्वेद डॉक्टरच असतात. त्यामुळे आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी मिळणे, हा ग्रामीण भागांत आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय आहे.
-आयुर्वेदिक डॉ. गणेश वाघ
----------------
ॲलोपॅथी डॉक्टरांचा निर्णयाला विरोध
डॉक्टरांत स्पर्धा होईल, म्हणून या निर्णयाला विरोध केला जात नाही. त्यात समाजाचाच तोटा आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळणार नाहीत. स्वस्त उपचार दूरगामी महागच पडेल. शिक्षण आयुर्वेद अन् उपचार ॲलोपॅथी असे होता कामा नये.
- ॲलोपॅथी डॉ. अनंत कुलकर्णी
--------------------
ॲलोपॅथी डॉक्टरांनी प्रशिक्षण दिल्यानंतरच आयुर्वेद डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकतील. अनेक वर्षाच्या शिक्षणानंतर ॲलोपॅथी डॉक्टर बाहेर येतात. प्रशिक्षण, सराव नसेल तर मोठ्या शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरू शकते. गुंतागुंत वाढू शकते.
- ॲलोपॅथी डॉ. अमित कोठारी
-----------
दोन्ही शाखांचे शिक्षण हे वेगवेगळे आहे. ग्रामीण भागातील रुग्ण हे अशिक्षित, कमी शिकलेले असतात. त्यामुळे कोणता डॉक्टर आहे, त्याची पदवी काय, हे त्यांना माहित नसते. त्यामुळे ग्रामीण रुग्णांचेच खरे नुकसान होईल.
- ॲलोपॅथी डॉ. फौजिया सिद्दीकी
-------------
नवीन कायद्याचा फायदा
ग्रामीण भागांत डॉक्टरांची संख्या कमी असल्याने छोट्या छोट्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना शहर गाठावे लागते. नव्या कायद्यामुळे ग्रामीण भागांतच शस्त्रक्रियांची सुविधा मिळू शकेल. तेही कमी दरात. शिवाय शहरात ये-जा करण्यात जाणारा वेळ, पैसा वाचू शकेल. त्यातून रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होऊ शकेल.
नवीन कायद्याचा तोटा
शस्त्रक्रियांचा सराव नसलेल्या डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया होताना गुंतागुंत होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. परिपूर्ण शस्त्रक्रिया होण्याच्या शक्यतेवर संशय व्यक्त होत आहे. अशावेळी आयुर्वेद डॉक्टरांकडून ॲलोपॅथी डॉक्टरांकडे रुग्णांना जाण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.