खुलताबादेत हनुमानभक्तांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:06 IST2017-08-13T00:06:05+5:302017-08-13T00:06:05+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसºया शनिवारी खुलताबादनगरीत भक्तांनी गर्दी केली होती

खुलताबादेत हनुमानभक्तांचा मेळा
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसºया शनिवारी खुलताबादनगरीत भक्तांनी गर्दी केली होती. यानिमित्त भद्रा मारुतीच्या मूर्तीला आकर्षकरीत्या फुलांनी सजविण्यात आले होते. या आकर्षक सजावटीने येथे आलेल्या भाविकांचे लक्ष वेधले.
शुक्रवारी सायंकाळपासूनच धुळे, नाशिक, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून खुलताबादनगरीत पायी दिंडी पालखी दाखल होत होत्या, तर रात्री औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून पायी येणाºया भाविकांची वर्दळ सुरू झाली. औरंगाबाद-खुलताबाद, कन्नड-खुलताबाद, फुलंब्री-खुलताबाद, कसाबखेडा फाटा मार्गावरून पायी येणाºया भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीपासूनच खुलताबाद शहरात जय भद्राचा जयघोष सुरू झाला होता. सकाळी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
खुलताबाद पोलिसांनी रात्रीपासून तगडा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस निरीक्षक हरीश खेडकर व त्यांचे पोलीस कर्मचारी हे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून गर्दीवर, तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, सचिव कचरू पाटील बारगळ, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत होते.
श्रावण महिन्यातील तिसºया शनिवारी भद्रा मारुतीची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. औरंगाबाद येथील जयसुख पटेल, नीलेश देशमुख, संजय काळे, वल्लभ लढ्ढा, कृष्णा भूतडा आदींनी या सजावटीसाठी पुढाकार घेतला. दरम्यान, दोन दिवस सलग सुटी असल्याने भद्रा मारुतीसह वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते, तसेच वेरूळ लेणी पाहण्यासाठी मोठी गर्दी असल्याने लेणी परिसरात वाहनाच्या गर्दीने भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. येथील दौलताबाद किल्ला परिसरही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
चोख बंदोबस्त
खुलताबाद येथे होणारी गर्दी लक्षात घेता श्रावणाच्या तिसºया शनिवारी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. भाविकांचे मोबाइल, पर्स, पॉकेट व दागदागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ शेख नदीम, मुळे हे साध्या वेशात फिरून पाकीटमारांवर लक्ष ठेवून होते.