चक्क मजुराच्या हाती करमूल्यांकनाच्या चाव्या
By Admin | Updated: July 15, 2016 01:09 IST2016-07-15T00:40:08+5:302016-07-15T01:09:01+5:30
औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. दुसरीकडे प्रभाग ‘ई’ मध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करीत

चक्क मजुराच्या हाती करमूल्यांकनाच्या चाव्या
औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. दुसरीकडे प्रभाग ‘ई’ मध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करीत असलेल्या सफाई मजुराकडे नागरिकांनी मालमत्तांना कर आकारणी करून द्या, अशी मागणी केलेले तब्बल ५५ अर्ज सापडले. चिरीमिरीच्या अपेक्षेने या वसुली अधिकारी तथा सफाई मजुराने गेल्या कित्येक दिवसांपासून हे अर्ज स्वत:जवळ कर आकारणी न करता दाबून ठेवल्याचे आढावा बैठकीत समोर आले.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढते आहे. शहरात नवीन मालमत्ता वाढत असताना त्यांना कर आकारणी केली जात नसल्यामुळे नागरिक आपल्या मालमत्तांना कर आकारणी करून घेण्यासाठी प्रभाग कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र जोपर्यंत कर आकारणी करणाऱ्यांचा खिसा गरम होत नाही, तोपर्यंत त्या मालमत्तांना कर आकारणीच केली जात नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
जानेवारीपासून वसुली अधिकारी बनलेला सफाई मजूर अर्ज निकाली काढत नाही. जर एका प्रभागात हे चित्र आहे तर अन्य विभागातील काय अवस्था असेल. अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असतील याची चौकशी झाली पाहिजे. गेल्या वर्षभरात या भागात किती मालमत्तांचे कर कमी करण्यात आले आहेत, याविषयी माहिती मागविली आहे. याशिवाय चुकीची कर आकारणी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे उपमहापौरांनी सांगितले.