ग्रामीण भागातही मिळेल अपंगांचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:07 IST2017-08-11T00:07:51+5:302017-08-11T00:07:51+5:30
जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात अपंगांचे आॅनलाइन प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था सुरू करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत

ग्रामीण भागातही मिळेल अपंगांचे प्रमाणपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात अपंगांचे आॅनलाइन प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था सुरू करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. यातून प्रमाणपत्रासाठी ग्रामीण भागातून थेट घाटी रुग्णालयात येण्याचा त्रास कमी होणार आहे. शिवाय प्रमाणपत्राची प्रतीक्षायादी कमी होण्यास मदत होणार आहे.
अपंग प्रमाणपत्र वाटपाची जबाबदारी ही जिल्हा सामान्य रुग्णालयाची आहे; परंतु औरंगाबादेत स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय नाही. सध्या या रुग्णालयाचे (मिनी घाटी) बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अपंग प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी घाटी रुग्णालय पार पाडत आहे. घाटी रुग्णालयावर अपंग प्रमाणपत्र वाटपाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय प्रमाणपत्रासाठी जिल्हाभरातून दिव्यांगांना (अपंग) घाटीत यावे लागते. त्यातून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
जिल्ह्यातील दिव्यांगांना ग्रामीण भागातही अपंग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्यानुसार जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू करण्याची मागणी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. कंदेवाड यांनी वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथे ही सुविधा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित रुग्णालयांना सूचना करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी सांगितले. या सुविधेमुळे अपंगांची होणारी गैरसोय थांबेल, असे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे म्हणाले.