हातगाड्यांचा तिढा कायम
By Admin | Updated: July 23, 2014 00:42 IST2014-07-23T00:39:47+5:302014-07-23T00:42:27+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सिटीचौक ते शहागंज परिसरातील मुख्य रस्त्यावरच बाजार भरला असून, २९ तारखेपर्यंत तो बाजार कायम राहण्याची शक्यता आहे.

हातगाड्यांचा तिढा कायम
औरंगाबाद : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सिटीचौक ते शहागंज परिसरातील मुख्य रस्त्यावरच बाजार भरला असून, २९ तारखेपर्यंत तो बाजार कायम राहण्याची शक्यता आहे. वाहतुकीची आणि काही सराफा व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची कोंडी झाल्यामुळे त्यांनी आज बंद पाळून मनपा, पोलीस प्रशासनाचा निषेध केला. व्यापारी दुकाने बंद ठेवण्यावर ठाम आहेत. मनपाने केलेली कारवाई अर्धवट व नाटकी असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. तर दरवर्षी सिटीचौक ते शहागंजपर्यंत बाजार भरतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे होते.
दुपारी ३ वा. मनपा, पोलीस प्रशासनाने दुतर्फा दुकानांसमोरील शेडस् हटविण्यासाठी आवाहन केले. मंगळवारचा पूर्ण दिवस शहागंज ते सिटीचौक या भागात तणाव होता. कारवाईपूर्वी व नंतर तीन वेळेस तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. शहागंज ते सिटीचौकपर्यंत ५०० दुकाने असतील.
व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार दिवस भरणारा बाजार आठवड्यापासून भरल्यामुळे व्यापाऱ्यांचे धंदे बसले आहेत. रस्ता रुंदीकरण मोहिमेत व्यापाऱ्यांनी स्वत:हून मदत केली. ते रस्ते रुंद झाले, मात्र ते आता पुन्हा अतिक्रमित होत आहेत. चार दिवसांपासून मनपा व पोलीस काहीही कारवाई करीत नसल्यामुळे दुकानांच्या चाव्या मनपा आयुक्तांना भेट देण्याचे आंदोलन व्यापाऱ्यांनी हाती घेण्याचे ठरविले होते. मंगळवारी सकाळी माजी आ.किशनचंद तनवाणी, नगरसेवक जगदीश सिद्ध आदी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना निवेदन दिले.
पोलिसांकडे यादी
सिटीचौक पोलीस तीन दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध लागलेल्या हातगाड्यांची माहिती संकलित करीत आहेत. हातगाड्यांना क्रमांक टाकून गाडीमालकाचे नाव, पत्ता, ओळखपत्राची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे.
पोलीस निरीक्षक नागनाथ कोंडे म्हणाले, वरिष्ठ पातळीवरून आम्हाला सतर्क राहण्याचे आदेश आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. दहशतवादी कारवाया वाढलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बाजारात व्यवसायासाठी आलेल्या प्रत्येकाची माहिती संकलित केली आहे.
२५ हजारांत दिली जागा
सिटीचौक ते गांधी पुतळा शहागंज या रस्त्याचा फेरफटका मारला असता असे लक्षात आले की, काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील जागा २५ ते ३० हजार रुपयांमध्ये ७ दिवसांसाठी भाड्याने दिली आहे.
४सुकामेवा, ज्वेलरी, शू स्टोअरसाठी ती जागा देण्यात आली आहे. त्या दुकानांवरच अतिरिक्त गर्दी होत असल्यामुळे ५० फु टांचा रस्ता १५ फूट शिल्लक राहतो आहे.
पालिकेचे मत असे..
पालिकेचे उपायुक्त किशोर बोर्डे म्हणाले, आज शेडस्वर कारवाई करण्यात आली असून, प्रत्येक व्यापाऱ्याला सांगण्यात आले.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेडस् काढून घेण्यासाठी सर्वांना मुदत दिली होती. उद्या २३ रोजी रस्त्यातील हातगाड्यांवर कारवाई करण्यात येईल. यावेळी अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, पोलीस निरीक्षक नागनाथ कोंडे, धर्मराज देशमुख आदींची उपस्थिती होती.
1सराफ्यातील सुमारे २०० व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्यामुळे सुमारे ३ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा सराफा असोसिएशनने केला.
2जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही, तोपर्यंत दुकाने न उघडण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. मनपा आणि पोलिसांनी केलेली कारवाई नाटकी असल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला.