बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

By Admin | Updated: June 24, 2014 00:21 IST2014-06-24T00:21:53+5:302014-06-24T00:21:53+5:30

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले.

Hammer on encroachment in market area | बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले. एकाच दिवसात सुमारे दीडशे दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले असून मंगळवारी गांधीचमनपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी सुरू केली.पहिल्याच दिवशी वीर सावरकर चौक पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी नूतन वसाहत भागातील अतिक्रमणे हटविली.
रविवारी सुटीमुळे ही मोहीम राबविण्यात आली नाही. मात्र आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता जुना जालन्यातील सर्वात जुना बाजार ओळखल्या जाणाऱ्या बाजार चौकी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास पालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रारंभ केला. दोन्ही बाजूंची सुमारे दीडशे अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.
या भागात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सुरूवातीला नागरिकांना काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात आले नाही.
विक्रेत्यांनाही कळले नाही. मात्र अतिक्रमणे हटविण्यास पालिका कर्मचारी व पोलिसांचे पथक असल्याचे कळताच अतिक्रमणे केलेल्या काही विक्रेत्यांनीही आपली अतिक्रमणे स्वत:हून काढण्यास सुरूवात केली.
हा रस्ता अत्यंत अरूंद आहे. विक्रेत्यांच्या दुकानासमोर किरकोळ भाजीपाला विक्रेते खाली रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसतात. त्यामुळे या भागातून दुचाकीधारकांनाही ये-जा करण्यास अडचण होते. शिवाय मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांची या भागातून ये-जा सुरू असते. अशावेळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना विशेषत: महिलांना त्रास होतो. त्यामुळे या बाजारातील अतिक्रमण हटविणे महत्वाचे होते. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
अनेक दिवसांपासून थाटलेली होती अतिक्रमणे
बाजार चौकी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणे आहेत. मात्र त्याकडे प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आलेले आहे. एक-दोन वेळा ही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र तेथे पुन्हा अतिक्रमणे थाटण्यात आली. नगरपालिकेने यापूर्वी सदर भागातील अतिक्रमणे हटविण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्ष कारवाई केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचारी व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
महिला वर्गातून कारवाईबद्दल समाधान
जुना जालन्यातील सर्वात जुनी भाजीमंडई म्हणून बाजारचौकी परिसराची ओळख आहे. मात्र अनेक दिवसांपासून या भागात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे येथे सतत रहदारी ठप्प होते. या अतिक्रमणांचा त्रास रहदारीला तर होतोच, परंतु बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही होतो. त्यामुळे या मोहिमेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे.

Web Title: Hammer on encroachment in market area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.