परळी शहरातील अतिक्रमणावर हातोडा

By Admin | Updated: September 17, 2014 01:13 IST2014-09-17T00:25:03+5:302014-09-17T01:13:50+5:30

परळी: मागील पाच वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून येथील गजबजलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघात होत होते.

Hammer on the encroachers in Parli city | परळी शहरातील अतिक्रमणावर हातोडा

परळी शहरातील अतिक्रमणावर हातोडा


परळी: मागील पाच वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून येथील गजबजलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघात होत होते. तसेच पादचारी व सर्वसामान्यांनाही याचा त्रास होत होता. मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने शहरातील हनुमान मंदिर परिसर, मोंढा भागातील अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यात आला. यावेळी पानटपऱ्या, पत्र्याचे शेड, अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. कारवाईनंतर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
मागील काही वर्षांपासून हनुमान मंदिर परिसरातील रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत होती. तसेच मंदिराच्या भिंतीला चिटकूनच चहाची दुकाने, पानटपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. विविध हॉटेल, दुकाने थाटल्यामुळे अतिक्रमण वाढले होते. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी मोंढ्यात असले असता त्यांची या हॉटेलमध्ये भूक भागत होती. मात्र हे हॉटेल अनाधिकृत जागेत असल्याने मंगळवारी या अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यात आला.
कामांसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या मोंढा भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. तसेच हनुमान मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण थाटल्यामुळे वाहनधारकांना व भाविक भक्तांची मोठे हाल व्हायचे. दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होत असल्याने अनेक वेळा ही अतिक्रमणे हटवावीत, अशा मागण्या करण्यात येत होत्या. अखेर सर्वसामान्यांनी केलेल्या मागणीला मंगळवारी यश आले.
मंगळवारी परळीचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात या भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली. हॉटेल, दुकाने, पानटपऱ्या हटविल्यामुळे या भागातील रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. पाच वर्षानंतर ही अतिक्रमणे हटल्याने मोंढ्यात जी गैरसोय होत होती ती आता होणार नाही, असे बोलले जात आहे.काही वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी मोंढा भागातील अतिक्रमणावर हातोडा फिरविला होता.
मात्र पुन्हा ही अतिक्रमणे थाटली आणि पहिले पाढेपंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी पोलीसांनी हटविलेले अतिक्रमण पुन्हा बसू देऊ नये, अशी मागणी केली जात असून जे अतिक्रमणे करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असा सूर सर्वसामान्यांतून निघत आहेत. (वार्ताहर)
मोंढा भागातील अतिक्रमणे हटविण्यामुळे येथे येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने व्यापारी, नागरिकांमधून काही प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे. तसेच हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणावर हातोडा फिरविल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक, भक्तांची गैरसोय टळणार आहे. आता ही अतिक्रमणे पुन्हा थाटू देऊ नयेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

Web Title: Hammer on the encroachers in Parli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.