‘त्या’ अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा
By Admin | Updated: November 6, 2014 01:36 IST2014-11-06T00:38:03+5:302014-11-06T01:36:27+5:30
बीड : शहरात वाढलेले अतिक्रमण हे अपघातास निमंत्रण देत होते, तसेच वाहतुकीसह अडथळा निर्माण करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच

‘त्या’ अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा
बीड : शहरात वाढलेले अतिक्रमण हे अपघातास निमंत्रण देत होते, तसेच वाहतुकीसह अडथळा निर्माण करीत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला पत्र पाठवून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेश दिले. बुधवारी या मोहिमेला प्रत्यक्षात सुरूवातही झाली. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह हातगाड्यावाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अगोदरच रस्ते अरूंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत होती. तसेच अपघातालाही निमंत्रण मिळत होते. यापूर्वीही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. मात्र या मोहिमेनंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे थाटली. त्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत ‘राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अतिक्रमणे’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याची दखल घेत नवलकिशोर राम यांनी नगर परिषदेला मंगळवारी पत्र पाठवून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बुधवारी बार्शी रोड, जालना रोड, शिवाजी पुतळा ते राजूरी वेस दरम्यानच्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. एकूण ८६ अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्याचे स्वच्छता निरीक्षक सी.टी.तिडके यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, रूपकर जोगदंड यांनी कारवाईत सहभाग घेतला. एक जेसीबी, ६ ट्रॅक्टर आणि ५० कर्मचाऱ्यांचा लवाजमा सोबत घेऊन बंदोबस्तात कारवाया करण्यात आल्या. (प्रतिनिधी)