‘जलयुक्त’ची निम्मी कामे कागदावरच

By Admin | Updated: May 24, 2017 00:35 IST2017-05-24T00:35:09+5:302017-05-24T00:35:54+5:30

उस्मानाबाद : शेतीला शाश्वत शेतीकडे नेणारी योजना म्हणून जलयुक्तकडे पाहिले जाते. या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप आल्याने गावा-गावात जलसाक्षरता वाढण्याचे कामही होत आहे.

Half of the works of 'Jalukta' are on paper | ‘जलयुक्त’ची निम्मी कामे कागदावरच

‘जलयुक्त’ची निम्मी कामे कागदावरच

$िवशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : शेतीला शाश्वत शेतीकडे नेणारी योजना म्हणून जलयुक्तकडे पाहिले जाते. या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप आल्याने गावा-गावात जलसाक्षरता वाढण्याचे कामही होत आहे. त्यामुळेच ही योजना दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबादसाठी महत्त्वाची आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही निम्म्याहून अधिक कामे कागदावरच असल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यातील नागरिकांनी उचलून धरली आहे. त्यामुळेच अनेक गावांमध्ये ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे या योजनेत लोकसहभाग देत आहेत. अनेकांनी या योजनेसाठी लाखोंचा निधी उत्स्फूर्तपणे दिलेला असल्याने जिल्ह्यातील काही गावात तर ही योजना विक्रमी ठरते आहे. मात्र या लोकसहभागाच्या लोक उत्साहाच्या समोर शासकीय यंत्रणा थिटी पडते की काय? असा प्रश्न या योजनेची आकडेवारी पाहिली असता उपस्थित होत आहे.
२०१६-१७ या वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९१ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये कळंब १५, उस्मानाबाद ४०, परंडा ३०, तुळजापूर २८, लोहारा १५, वाशी १४, भूम २७, तर उमरगा तालुक्यातील २२ गावांमध्ये ही कामे करण्याचे नियोजन करण्यात आले. या सर्व १९१ गावांमध्ये १६ हजार ७९५ कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला तरी त्यातील ७ हजार ६४४ म्हणजेच केवळ ४५.५१ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. ५ हजार ४४९ कामे प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असून, तब्बल ३ हजार ७०२ कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे दिसून येते. पावसासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने त्यापूर्वी ही कामे उरकण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. निविदा प्रक्रियेमध्ये अडकलेल्या कामांची आकडेवारी पाहता कळंब तालुक्यातील तब्बल ४५० कामे अद्यापही निविदा प्रक्रियेत आहेत. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ७६३, परंडा तालुक्यातील २३४, तुळजापूर ३५३, लोहारा ५१९, वाशी १२५, भूम ३८३, तर उमरगा तालुक्यातील ८७५ कामे अद्यपही निविदा प्रक्रियेत आहेत. त्यामुळेच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात केव्हा होणार आणि ती कामे पूर्ण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेला नागरिकांचा लाभत असलेला प्रतिसाद पाहता प्रशासनाने कामांसाठी आणखी जोर लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Half of the works of 'Jalukta' are on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.