रोहित्र जळाल्याने अर्धेे गाव अंधारात

By Admin | Updated: September 11, 2014 00:06 IST2014-09-10T23:47:34+5:302014-09-11T00:06:13+5:30

महातपुरी गावातील दोन विद्युत रोहित्र जळाले आहेत़ रोहित्र दुरूस्त करण्यासाठी लाईनमन नसल्यामुळे अर्धे गाव अंधारात आहे़

Half of the villages are dark in Rohtak | रोहित्र जळाल्याने अर्धेे गाव अंधारात

रोहित्र जळाल्याने अर्धेे गाव अंधारात

महातपुरी : गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथे दोन-तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे़ त्यामुळे महातपुरी गावातील दोन विद्युत रोहित्र जळाले आहेत़ रोहित्र दुरूस्त करण्यासाठी लाईनमन नसल्यामुळे अर्धे गाव अंधारात आहे़ याचे सोयरसूतक वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींना नसल्याचेच दिसून येत आहे़
महातपुरी हे गाव ५ ते ६ हजार लोकसंख्येचे आहे़ या गावासाठी वीज वितरण कंपनीने एक लाईनमन दिला होता़ या लाईनमनवर गाव व कृषीपंप वीजजोडणीच्या दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती़ परंतु, गेल्या एक महिन्यापासून लाईनमनविनाच या गावाचा कारभार हाकला जात आहे़
गावामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ग्रामस्थांना तासन्तास वीज पुरवठ्याविनाच रहावे लागत आहे़ रात्रीच्या वेळी बिघाड झाल्यास ग्रामस्थांना अंधारातच रात्र काढावी लागते़ गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावातील दोन विद्युत रोहित्र जळाली आहेत़ यामुळे अर्धे गाव अंधारात आहे़ सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना रॉकेलच्या चिमणीवर रात्र काढावी लागत आहे़ तसेच दळण आणण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीत ग्रामस्थ दिवस काढत आहेत़ विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारत आहेत़ परंतु, याकडे वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे ग्रामस्थ छोटे मोठे बिघाड खाजगी व्यक्तीकडून करून घेत आहेत़ तसेच ग्रामस्थही स्वत:हूनच वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात़
यामध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार राहणार? असा प्रश्नही ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे़ गावाला लाईनमन द्यावा, म्हणून ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटूनही काही उपयोग झाला नाही़ त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़ वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष केले आहे़ याकडे लोकप्रतिनिधी व वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? (वार्ताहर)

Web Title: Half of the villages are dark in Rohtak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.