जिल्ह्यात डॉक्टरांच्या निम्म्या जागा रिक्त
By Admin | Updated: November 19, 2014 00:58 IST2014-11-19T00:52:09+5:302014-11-19T00:58:25+5:30
जालना : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर असलेल्या ८२ पैकी जवळपास निम्म्या म्हणजे ३८ जागा रिक्त आहेत

जिल्ह्यात डॉक्टरांच्या निम्म्या जागा रिक्त
जालना : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर असलेल्या ८२ पैकी जवळपास निम्म्या म्हणजे ३८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून जनतेला शहरी भागात जाऊन उपचार घेण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ४० आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रास एक किंवा दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागाची मोठी कुचंबना होत आहे. कारण जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत, त्यांच्यावर ताण पडत असून त्यापैकी काहीजण नियमित आरोग्य केंद्रांवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. एकीकडे डेंग्यू व हिवताप यासारखे साथरोग जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पसरलेले असताना नागरिकांना आरोग्य सेवा वेळेवर मिळणे दुरापास्त झाले आहे.
आरोग्य विभागाने यापूर्वीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, म्हणून शासन पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी २३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर उच्च पदवीच्या अभ्यासक्रमासाठी कार्यरत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे सादर करून कार्यमुक्त झाले होते. त्यामुळे पुन्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांंची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने ग्रामीण भागात बहुतांश आरोग्य केंद्रे सुनीसुनीच आहेत. कारण डॉक्टरच नसल्याने तेथे उपचारासाठी देखील कुणी जात नाही. जे जातात, त्यांना निराश होऊन शहरी भागाकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. कार्यरत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त केंद्रांची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना त्या-त्या केंद्रांवर जाण्यास विलंब होत असल्याने त्याचा त्रास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)