मुख्याध्यापकांची दीडशे पदे रिक्त
By Admin | Updated: June 27, 2017 00:24 IST2017-06-27T00:12:43+5:302017-06-27T00:24:32+5:30
नांदेड : गत पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांची दीडशे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़

मुख्याध्यापकांची दीडशे पदे रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गत पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांची दीडशे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ शिक्षकांच्या पदोन्नतीचे भिजत घोंगडे असल्याने मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा कधी भरणार, या प्रश्नाचे उत्तर शिक्षण विभागालाही सापडत नसल्याचे चित्र आहे़
जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अनेक शाळांना मुख्याध्यापक नसल्याने त्याठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी अडचणी येत आहेत़ शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम असतानाच मुख्याध्यापकांच्या रिक्त पदाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ मागील ५ वर्षापासून मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने या जिल्हा परिषद शाळांचा विकास खुंटला आहे़ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तसेच मध्यान्ह भोजन आदी योजना राबविल्या जातात़ मात्र अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांची संख्या तोकडी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे़ शाळामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करुन त्यांना अर्धिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी मुख्याध्यापकांना प्रयत्नशील रहावे लागते. ही जबाबदारी इतर शिक्षकांसह मुख्याध्यापकाची महत्वाची असते. मात्र जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांसह मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने या शाळा गुणवत्ता व भौतिक सुविधांपासून वंचित राहत आहेत़
जिल्ह्यात एकूण ५६० मुख्याध्यापकाची पदे मंजूर असून त्यापैकी ४१० पदे भरलेली आहेत़ २०१२ पासून १५० पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण १७५ केंद्रप्रमुखांची पदे असून १४३ भरलेली असून त्यापैकी ३२ पदे रिक्त आहेत. तर अराजपत्रिक मुख्याध्यापकांची दोन पदे रिक्त आहेत. दरम्यान, जि़ प़ चे उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी सांगितले, पदोन्नतीची कार्यवाही अद्याप झाली नाही़ त्यामुळे मुख्याध्यापकांच्या जागा अद्यापही रिक्तच आहेत़