निम्मे नेपानगर फसले

By Admin | Updated: July 29, 2014 01:14 IST2014-07-29T00:55:09+5:302014-07-29T01:14:08+5:30

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या गावांतही आपले जाळे पसरविले होते.

Half of Nepalese crops | निम्मे नेपानगर फसले

निम्मे नेपानगर फसले

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या गावांतही आपले जाळे पसरविले होते. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्यातील शेकडो कुटुंबांनी आपली शेती, घर, दागदागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. आता या कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे नेपानगरातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
औरंगाबादेत गुन्हा नोंदविण्यास नकार
औरंगाबाद पोलिसांनी सुपर पॉवरच्या संचालकांना अटक केल्याचे समजताच फसल्या गेलेले नेपानगरातील आठ ते दहा गुंतवणूकदार रविवारीच औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी त्यांना कुणी भेटलेच नाही. सोमवारी सकाळी या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांची तक्रार पोलिसांनी स्वीकारली नाही. ‘तुम्ही नेपानगरात पैसे भरलेले आहेत. तिकडेच तुम्हाला तक्रार द्यावी लागेल’ असे सांगून या गुंतवणूकदारांना परत पाठविण्यात आले. तक्रार देण्यासाठी आलेल्या नेपानगरातील गुंतवणूकदारांमध्ये प्रल्हाद कासारे, किशोरीलाल कठोतिया, वीरेंद्र पांझरे, मनोज चौरे, शिरीषकुमार रायबागकर, अशोक आर्या, शरदचंद्र मिस्त्रा यांचा समावेश आहे.
आठ दिवसांपासून भटकंती
नेपानगरातील हे गुंतवणूकदार गेल्या आठ दिवसांपासून पैशांसाठी भटकंती करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी ते महाराष्ट्रात आले. नाशिकला पारखेच्या घरी गेले. तेथे त्याच्या नातेवाईकांनी धमकावून हुसकावून लावले. मग ते नाशिक आयुक्तालयात गेले. तेथून त्यांना पंचवटी ठाण्यात पाठविण्यात आले. पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार देऊन औरंगाबादला तक्रार द्या, असे सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर येथेही त्यांची सोमवारी तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. शेवटी हताश होऊन ते गावाकडे परतले आहेत. विशेष म्हणजे या गुंतवणूकदारांकडे आज राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि गावी जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते.
नेपानगराला साडेतीन कोटींचा चुना
नेपानगरातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांनी सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणुकीची एकूण रक्कम सुमारे साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादेतील रहिवासी असलेल्या कैलास महाजन या व्यक्तीने नेपानगरात जाऊन तेथील नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले होते, असे येथील नेपानगरातून आलेले किशोरीलाल कठोतिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फसल्या गेलेले जवळपास सर्वच जण गरीब आहेत. कुणी शेती विकली, कुणी दागदागिने गहाण ठेवले, तर कुणी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम या कंपनीत गुंतविली होती, असेही कठोतिया म्हणाले.
गुंतवणूकदार म्हणतात...गावी गेलो तर लोक ठार मारतील!
औरंगाबादेत तक्रार देण्यासाठी आलेले हे गुंतवणूकदार प्रचंड दहशतीत होते. कारण या गुंतवणूकदारांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेकडो नातेवाईकांनीही गुंतवणूक केलेली आहे. आमचे पैसे घेऊन परत या, नाही तर ठार मारू, असे इतर गुंतवणूकदारांनी आम्हाला धमकावले आहे. आता गावात जावे तरी कसे? असा सवाल नेपानगरहून आलेल्या शिरीषकुमार रायबागकर यांनी उपस्थित केला.
पोलिसांकडूनकार्यालयाची झाडाझडती
सुपर पॉवर या कंपनीचे सिंधी कॉलनीत असलेल्या कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी झडती घेतली.
या कार्यालयातून काही धनादेश, महत्त्वाची कागदपत्रे, संगणक जप्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती.

Web Title: Half of Nepalese crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.