अर्धा किलो भाजी घेणारा पावशेरवर !
By Admin | Updated: July 4, 2014 01:11 IST2014-07-04T00:55:40+5:302014-07-04T01:11:31+5:30
एजाज पठाण , शिवना यंदाचा पावसाळा लांबल्याने दुष्काळाच्या भीतीपोटी शेतकरी, तसेच ग्राहकांनी येथील आठवडी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

अर्धा किलो भाजी घेणारा पावशेरवर !
एजाज पठाण , शिवना
यंदाचा पावसाळा लांबल्याने दुष्काळाच्या भीतीपोटी शेतकरी, तसेच ग्राहकांनी येथील आठवडी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. प्रचंड गर्दीमुळे चालण्यास कठीण वाटणारा आठवडी बाजार चक्क सुनासुना होता. त्यात आलेले ग्राहकही नेहमीपेक्षा निम्मी खरेदीच करीत होते.
येथील आठवडी बाजार प्रसिद्ध असून प्रचंड गर्दीमुळे चालणेही कठीण होते. गेल्या दोन आठवड्यांपासून मात्र चित्र पालटले आहे. शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी या बाजाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मेथी जुडी १०, टोमॅटो १० रुपये पाव, शेवगा २० रुपये पाव असे भाव होते, त्यामुळे जो ग्राहक अर्धा किलो खरेदी करीत असे तो पावकिलो भाजीच खरेदी करीत होता.
दोन आठवड्यांपासून खर्च निघणे कठीण झाले असून नवीन भांड्यांची विक्री होत नाही किंवा जुनी मोडही मिळत नाही, असे भांडी विक्रेते संजय काळे म्हणाले. दर आठवड्यात शिवना ते सिल्लोड अशा दोन फेऱ्या व्हायच्या. आता एक फेरी होणेही कठीण झाले आहे. त्यामुळे २ हजार रुपयांचा होणारा व्यवसाय ८०० रुपयांवर आला आहे, असे काळी-पिवळी मालक मेराजखान यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया...
या आठवड्यात तर आमचा केवळ ६० टक्के व्यवसाय झाला. बाजारात दरवेळी ८ ते १० हजारांचा व्यवसाय होतो. यावेळी मात्र २५०० ते २७०० रुपयांचाच व्यवसाय झाला, असे भाजीपाला व्यापारी अशोक केळोदे यांनी सांगितले.
यापूर्वी आमचा २० ते ३० हजार रुपयांचा व्यवसाय होत होता तो आता एकदम ६ ते ७ हजार रुपयांवर आला. आमच्याकडे वह्या, पुस्तके, दप्तराचा एक लाख रुपयांचा माल पडून आहे, असे शालेय साहित्य विक्रेते आबेदमामू पटेवकर यांनी सांगितले.
आमचा तीन ते चार हजारांचा व्यवसाय होत होता. आता तो केवळ ४०० ते ५०० रुपये एवढा होत आहे, असे कापड व्यापारी दिगंबर ढोले यांनी सांगितले.
प्रत्येक बाजाराला आम्हाला ४०० ते ५०० रुपये खर्च येतो. यापूर्वी आमचा १० ते १२ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता; पण तो आता केवळ १००० ते १५०० रुपये होत आहे, असे शेव-चिवडा विक्रेते कैलास नेमाडे म्हणाले.
पावसाळा सुरू होताच पावसाळी बुटांची मागणी वाढते, पण यंदा पाऊसच नसल्याने माल तसाच पडून आहे. शाळा सुरू झाल्या तरी व्यवसायात फरक पडला नाही. ८ ते १० हजार रुपये होणारा व्यवसाय २ ते ५ हजार रुपयांवर आल्याचे बूट-चप्पल विक्रेते कलीमभाई यांनी सांगितले.
दुष्काळामुळे दुकानांसाठी असलेले ओटेही रिकामे होते. अनेक व्यापाऱ्यांनी येथे येण्या-जाण्याचा खर्चही निघत नसल्याची तक्रार केली.