मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

By Admin | Updated: April 18, 2017 00:06 IST2017-04-18T00:00:20+5:302017-04-18T00:06:27+5:30

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे

Half-day supply despite huge water | मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे. शिवाय मागील आठ दिवसांपासून तर नळाद्वारे पाणीच आले नसल्यामुळे शहरवासियांत संताप व्यक्त होत आहे.
नळदुर्ग शहराची लोकसंख्या २० हजारच्या आसपास आहे. शहराला बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. बोरीधरणावर जॅकवेल असून, तेथे ४० एचपीचा व्हर्टीकल टर्बाईन पंप बसविलेला आहे. जॅकवेलपासून अडीच तीन किमी अंतरावर जलशुद्धीकरण केंद्र व तेथून एक किलोमिटर अंतरावर जलकुंभ बांधण्यात आले आहे. शहरात जवळपास ३४५० घरे असून, फक्त २१०० घरात नळकनेक्शन आहे. प्रत्येक नागरिकांची दैनंदीन पाण्याची गरज ६० लिटर इतकी आहे. शहराची लोकसंख्या व पाण्याची गरज विचारात घेता शहराला दररोज १२ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. बोरी धरणावरील व्ही.टी.पंप दर मिनीटाला ८०० लिटर पाणी उपसा करते. धरणावरील पंप दिवसभरात जवळपास २० तासापेक्षा जास्त काळ चालू राहतो. या काळात १० लाख ८ हजार लिटर पाण्याचा उपसा दररोज होतो. असे असतानाही पालिका ५ ते ६ दिवसाआड एक तास पाणी पुरवठा करीत आहे. दररोज १० लाख लिटर पाणी उपसा होवूनसुद्धा नागरिकांना ६ दिवसाआड पाणी मिळू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आ. मधुकरराव चव्हाण यांनी शहराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेवून शहरात नवीन शुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व जलवाहिन्या निर्माण करण्यासाठी ४ कोटी १९ लाख रुपयाची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मात्र नकाशाप्रमाणे शहरात पाईपलाईन न टाकता अन्य ठिकाणी टाकल्याने शहरातील जवळपास ९०० नळधारकांना जुन्या पाईप लाईनवरुन पाणी पुरवठा होत आहे. मागच्या टंचाईकाळात सत्ताधारी काँग्रेस पक्ष नळाला पाणी वेळेवर सोडत नाही म्हणून विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने पालिकेवर गाढव मोर्चा आणून निषेध व्यक्त केला होता. पाणी प्रश्नामुळे काँग्रेसच्या हातून पालिकेची सत्ता गेली व राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता मिळविली. आता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असून, त्यांनी २६ डिसेंबर रोजी पालिकेची सुत्रे हाती घेतली. आज ४ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पालिकेच्या कामकाजात तसुभरही फरक दिसत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Half-day supply despite huge water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.