निम्म्या एटीएमचे ‘शटर डाऊन’!
By Admin | Updated: December 29, 2016 22:53 IST2016-12-29T22:52:22+5:302016-12-29T22:53:29+5:30
बीड पाचशे- हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४८ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील चलनटंचाई दूर झालेली नाही.

निम्म्या एटीएमचे ‘शटर डाऊन’!
संजय तिपाले बीड
पाचशे- हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४८ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील चलनटंचाई दूर झालेली नाही. शहरातील निम्म्या एटीएममध्ये खडखडाट कायम आहे. डझनभर एटीएमचे शटर चोवीस तास ‘डाऊन’च असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. तथापि, आतापर्यंत पाचशे, हजार रुपयांच्या १२०९ कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या असून ११० कोटी रुपयांच्या नव्या नोटा दाखल झाल्या आहेत. त्यापैकी केवळ २५० कोटी रुपये आतापर्यंत बँकेतून ‘विड्रॉल’ झाले आहेत.
नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून आतापर्यंत चलनटंचाईत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्याचा फटका बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मोठे व्यवहार तर दूरच;पण साधे किराणा सामान खरेदी करायचे म्हटले तरी वांधे निर्माण झाले आहेत. दरम्यान, नागरिकांना सुरुवातीला नोटाबंदलीसाठी बँकेच्या रांगेत थांबावे लागले होते. एटीएम व आॅनलाईन बँकिंग सुविधा नसलेल्यांची तर अधिकच अडचण झाली. त्यांना खात्यातील हक्काचा पैसा मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले. एटीएम सुविधा असलेल्यांचीही याहून वेगळी स्थिती नव्हती. शहरातील १० ते १२ एटीएम ४८ दिवसांत एकदाही उघडले नसल्याची नवीन माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे काही एटीएममध्ये पैशांचा भरणा होत आहे;परंतु तेथेही पैसे काढण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. परिणामी एटीएम यंत्रात पैसे भरल्यानंतर ते अवघे सहा तासांत संपत आहेत. त्यामुळे लांबलचक रांगेत उभे राहूनही पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नाही. दहा दिवसांपूर्वी सलग तीन सुट्यांमध्ये तर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बँका बंद.. एटीएममध्ये खडखडाट... त्यामुळे चाकरमान्यांना सुट्यांचा आनंदही उपभोगता आला नाही. अनेकांची सुटी पैशांची जुळवाजुळव करण्यातच गेली.
नोटबंदीच्या निर्णय होऊन ४८ दिवस उलटले तरीही एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नाही. त्यामुळे सामान्यांची अडचण कायम असून हातात कार्ड घेऊन त्यांना पैशांसाठी वेगवेगळ्या एटीएमवर खेटे मारावे लागत आहेत. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकांची लगबग सुरू आहे.