सोयाबीनवर ‘हळद्या’चा हल्ला
By Admin | Updated: September 28, 2014 00:41 IST2014-09-28T00:35:46+5:302014-09-28T00:41:54+5:30
औसा : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली़ कारण संकटाचा सामना करीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या

सोयाबीनवर ‘हळद्या’चा हल्ला
औसा : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली़ कारण संकटाचा सामना करीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकटे मात्र फेर धरून आहेत़ मागील वर्षी रबी हंगामात गारपीट, खरीप हंगामातही पावसाची उघडीप, उशिराने झालेल्या पेरण्या व पुन्हा पाऊस गायब झाल्याने पाणीटंचाई कायम व हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनवरही हळद्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़
औसा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले़ मागील चार-पाच वर्षातील पावसाची वर्गवारी पाहता पाऊस कमी कमी होत गेल्याचे दिसून येत आहे़ परिणामी पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे़ मागील वर्षी सबंध तालुक्यात रबी हंगामातील पिके जोमदार होती़ पण ही पिकेहाता-तोंडाशी आल्यानंतर मार्च महिन्यात दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली़ आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़ त्यामधून कसातरी सावरलेला शेतकरी खरीप हंगामाची वाट पाहू लागला़ पण खरीप हंगामातील पेरण्यासाठी पाऊस वेळेवर झाला नाही़ तब्बल एक महिना उशिराने पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ अन् ६० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ अनेकांना दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या़ अन् पुन्हा पाऊस गायब झाला़ कमीअधिक पावसावर सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले होते़ पण आता हळद्याचा फटका बसणार आहे़
औसा तालुक्यात यावर्षी ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ पेरण्या उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्रावर पेरण्या केलेल्या सोयाबीनला कधी कमी व कधी रिमझिम पावसामुळे रोगराईचे प्रमाण अधिक वाढले आहे़ यामुळे अधिक फवारण्या करून मेटाकुटीला आलेला शेतकरी आता हळद्या रोगाच्या हल्ल्यामुळे हवालदिल झाला आहे़ यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहेच़ पण परिपक्व न होताच सोयाबीन काढणीला येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत़ एक झाले की दुसरे संकट येत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शेती धरताही येईना आणि सोडताही येईना अशी अवस्था झाली आहे़(वार्ताहर)