हळदीला आला भाव

By Admin | Updated: July 17, 2017 00:32 IST2017-07-17T00:31:23+5:302017-07-17T00:32:55+5:30

नांदेड: शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रूपयांनी खरेदी केलेली हळद आता साडेआठ हजार रूपयेप्रमाणे खरेदी करण्यात येत आहे़

Halde | हळदीला आला भाव

हळदीला आला भाव

भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पावसाने दिलेल्या ओढीनंतर मोंढा बाजारात हळदीचा विक्रमी भाव वाढला असून यापूर्वी शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रूपयांनी खरेदी केलेली हळद आता साडेआठ हजार रूपयेप्रमाणे खरेदी करण्यात येत आहे़
सध्या नांदेडच्या नवा मोंढा बाजारात गत महिनाभरापासून शेतकऱ्यांकडील उर्वरित हळदीची आवक सुरु आहे. गेल्या हंगामात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे यंदा एप्रिलपासूनच जिल्ह्यातून हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली़ दिवसाकाठी किमान १ ते दीड हजार क्विंटल हळदीची खरेदी-विक्री होत होती़ सध्या ८०० ते १००० पोत्यांची आवक होत आहे़ गत आठ दिवसांपासून बाजारात हळदीच्या भावाने उसळी घेतली़
नवा मोंढा बाजारात सकाळी आणि सायंकाळी या दोन वेळेमध्ये लिलाव पद्धतीने हळदीची विक्री करण्यात येते. हळदीची दिवसेंदिवस वाढत जाणारी आवक यामुळे दरामध्येही मोठी घसरण झाली़
प्रारंभी हळदीला प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर ७५०० ते ८ हजार रुपयांवर आला होता. तर पुन्हा त्यात घसरण होत मे, जून महिन्यात ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत हळदीची विक्री झाली़ खरीप पेरणीचा हंगाम आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजाने खरेदीदार मागतील त्या दरामध्ये हळदीची विक्री करावी लागली़
दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत हळदीची खरेदी करण्यासाठी जवळपास ८ ते १० खरेदीदारांना बाजार समितीने खरेदीसाठी परवानगी दिलेली आहे. या खरेदीदारांकडून हळदीची कोट्यवधीची उलाढाल होते़ शेतकऱ्यांनी आपली हळद मे, जून महिन्यात कमी भावात विकल्यानंतर गत महिनाभरापासून पावसाने चांगलीच ओढ दिली़ त्यामुळे बाजारपेठेत हळदीचे भाव पुन्हा वधारले़
शेतकऱ्यांकडे साठवून ठेवलेली असलेली हळद बाहेर आली असून काही मोजक्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे़ शेतकऱ्यांच्या मालाची कमी दराने खरेदी करून अधिक दराने विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आता चढ्या भावाचा लाभ मिळणार आहे़

Web Title: Halde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.