हज यात्रेकरूंचा प्रवास येत्या ७ सप्टेंबरपासून

By Admin | Updated: August 12, 2014 02:01 IST2014-08-12T01:37:06+5:302014-08-12T02:01:17+5:30

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची इच्छा प्रत्येक मुस्लिम बांधवाला होत असते. इस्लाममधील पाच अत्यावश्यक बाबींमध्ये हज यात्रेला

Haj pilgrims visit here on 7th September | हज यात्रेकरूंचा प्रवास येत्या ७ सप्टेंबरपासून

हज यात्रेकरूंचा प्रवास येत्या ७ सप्टेंबरपासून



औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची इच्छा प्रत्येक मुस्लिम बांधवाला होत असते. इस्लाममधील पाच अत्यावश्यक बाबींमध्ये हज यात्रेला स्थान देण्यात आले असल्याने दरवर्षी हज यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होतात. यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०० यात्रेकरू जाणार आहेत. ७ सप्टेंबरपासून ही यात्रा सुरू होईल.
सौदी अरेबिया सरकारने यंदा भारताच्या कोट्यात २० टक्के कपात केली आहे. त्यामुळे यात्रेकरूंची संख्याही झपाट्याने घटली आहे. मागील वर्षी मराठवाड्यातून ३ हजार ३०९ यात्रेकरू हज यात्रेला गेले होते. यंदा २ हजार ४०० यात्रेकरूंनाच संधी मिळाली आहे. यात्रेकरूंसाठी एकूण पाच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आले. शेवटचे शिबीर ९ आणि १० आॅगस्ट रोजी जामा मशीद येथे पार पडले. या शिबिरात तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. हज यात्रेतील प्रवास, ‘अहेराम-उमरा’, हजच्या प्रक्रियेतील पाच दिवस, मदिना येथील धार्मिक विधीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे मरकज- ए- खिदमात हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले. शिबिरासाठी जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, नांदेड येथून १८०० पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते.
सोमवार ११ आॅगस्टपासून सर्व यात्रेकरूंना मेंदूज्वरची लस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी ३६० यात्रेकरूंना लस देण्यात आली. जामा मशीद परिसरातील इमाम हॉल येथे लसीकरण सुरू असून, १३ आॅगस्टपर्यंत दररोज सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान लस देण्यात येणार आहे. यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
७ सप्टेंबरपासून मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून पवित्र हज यात्रेला रवाना होतील. दररोज २४० यात्रेकरू रवाना होणार असून, १६ सप्टेंबरपर्यंत दररोज एक विमान सुरू राहणार आहे. १८ आॅक्टोबरपासून हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे करीम पटेल यांनी नमूद केले.

Web Title: Haj pilgrims visit here on 7th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.