गारपिटीचा तडाखा!
By Admin | Updated: March 1, 2016 00:37 IST2016-03-01T00:10:23+5:302016-03-01T00:37:59+5:30
जालना : भोकरदन, मंठा, परतूर व बदनापूर, घनसावंगी तालुक्यांतील अनेक गावांना रविवारी मध्यरात्री व सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला.

गारपिटीचा तडाखा!
जालना : भोकरदन, मंठा, परतूर व बदनापूर, घनसावंगी तालुक्यांतील अनेक गावांना रविवारी मध्यरात्री व सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अगोदरच दुष्काळाने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच गारांमुळे जेमतेम आलेल्या रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांना जबर फटका बसला. रबी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतातूर झाले.
भोकरदन तालुक्यातील लेहा, शेलूद परिसरात रविवारी रात्री जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला. अर्ध्यातास झालेल्या पावसामुळे गहू व हरभऱ्याचे पीक जमीनदोस्त झाले. सायंकाळी अवकाळी पावसाला सुरूवात झाली. पिंपळगाव रेणुकाई, हसनाबाद, केदारखेडा, राजूर, पारध, हिसोडा, आदी भागात जोरदार पाऊस झाला. मात्र लेहा व शेलूद गावाच्या परिसरामध्ये बोराच्या अकाराची गारपीट झाली. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. काही ठिकाणी साठवून ठेवलेला चाराही भिजला. गहू, हरभरा, कांदा सीडस्, मका या रबी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल. शेलूद धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी रबी पिकाची लागवड केली होती. मात्र रात्रीचा अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे या परिसरातील अनेक छतावरील पत्रे उडून गेली. झाडे उन्मळून पडली. भोकरदन - जालना रस्त्याच्या कामासाठी काढण्यात आलेल्या वळण रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला. ट्रक फसल्यामुळे चार तास वाहतूक ठप्प होती.
आष्टी- परिसरात सोमवारी दुपारी गारांचा पाऊस झाला. यात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.
मंठा: तालुक्यात तळणीसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे रबी पिकांसह शेडनेट जमीनदोस्त होऊ न फ ळबागांनाही फ टक ा बसल्याने मोठे नुक सान झाले. यात घरावरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली. लोणार-मंठा रस्त्यावर वडगाव व तळणी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साडेचार ते साडेपाच या वेळेत झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ७ वाजता वडगाव सरहद येथील झाडे ग्रामस्थांच्या मदतीने तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. लोणार रस्त्यावर गजानन महाराज मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होऊ न महाप्रसादाचे वितरण होणार होते. अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने भाविकांची तारांबळ उडाली. मंडप उडून गेला. प्रसाद वाटपाअधीच पत्रे उडाल्याने तसेच गारांमुळे मोठी नासाडी झाली. अनेक जणांना गारांत झोडपून निघाले.