खुनाच्या निषेधार्थ जळकोट बंद
By Admin | Updated: December 28, 2015 23:25 IST2015-12-28T23:09:24+5:302015-12-28T23:25:07+5:30
जळकोट : येथील तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जळकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

खुनाच्या निषेधार्थ जळकोट बंद
जळकोट : येथील तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जळकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, मराठवाड्यातील आर्य वैश्य समाजातील जवळपास दोनशे कार्यकर्त्यांची आंदोलनात उपस्थिती होती.
१८ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलेल्या रोहित दिलीप कोंडावार यांचा खून झाल्याचे निष्पन्न होताच जळकोट शहरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. सोमवारी आठवडी बाजार असतानाही संतप्त नागरिकांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, पोलिस महासंचालकांना दिले आहे. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास जळकोट पोलिस ठाण्यात आर्य वैश्य समाजातील कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष व्यंकट तेलंग, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी केंद्रे, रमाकांत रायेवार, व्यंकटराव कोटगिरे, प्रकाश गट्टेवार, कृष्णा कोटलवार, प्रदीप कोकडवार, दिगंबर लाभशेटवार, सूर्यकांत कोकड, अतुल चालिकवार, प्रा. सुनील वट्टमवार, राम वट्टमवार आदींची उपस्थिती होती.
सहाय्यक पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, पोलिसांचे पथक मृतदेहाचा शोध व पंचनाम्यासाठी रवाना होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे पोलिस उपविभागीय अधिकारी कबाडे हे जळकोट शहरात दिवसभर तळ ठोकून आहेत. पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले असून, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. अपहरण झाल्यापासून पोलिस उपनिरीक्षक पी.जी. शिरसे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड यांनी जळकोट शहराला भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. (वार्ताहर)
भावजींच्या आर्थिक व्यवहारातून मेहुणा रोहित दिलीप कोंडावार यांचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासूनच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत टप्प्या-टप्प्याने संशयितांना अटक केली होती. संशयितांना अटक करताच रोहितचा तपास लागण्याची शक्यता बळावली. रोहितचा मृतदेह कर्नाटक राज्यात आढळून आल्याची माहिती कर्नाटक पोलिसांकडून मिळताच शहरात संतापाची लाट उसळली.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त...
४या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर कलम ३०२, २०१, १२० (ब) प्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना ३० डिसेंबरपर्यंत, दोन जणांना २ जानेवारीपर्यंत व अन्य तीन जणांना ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेत वापरण्यात आलेली एमएच २४ व्ही ०६१५, एमएच ०१ एसी ८२०३ ही दोन वाहने जळकोट पोलिसांनी जप्त केली आहेत.