फार्म हाऊसमध्ये गुटखा

By Admin | Updated: September 28, 2016 00:52 IST2016-09-28T00:32:24+5:302016-09-28T00:52:09+5:30

औरंगाबाद : पोटूळच्या फार्म हाऊसमध्ये अवैधरीत्या करण्यात आलेला गुटख्याचा मोठा साठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जप्त केला.

Gutkha in farm house | फार्म हाऊसमध्ये गुटखा

फार्म हाऊसमध्ये गुटखा


औरंगाबाद : पोटूळच्या फार्म हाऊसमध्ये अवैधरीत्या करण्यात आलेला गुटख्याचा मोठा साठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जप्त केला. या ठिकाणाहून शहरात पाठविली जाणारी गुटखा भरलेली तीन वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत २५ लाख रुपयांचा गुटखा आणि १० लाख रुपयांची वाहने, असा ३५ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे गुटखा तस्करांत खळबळ उडाली आहे.
गुटखा भरलेली दोन वाहने औरंगाबादेत येणारी असल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार प्रशांत आवारे, फौजदार घोडके, सहायक
फौजदार भंडारी, हवालदार झिने, पोलीस नाईक राठोड, पोलीस शिपाई थोरात, गुप्ता. चव्हाण, माताडे, गायकवाड, कचरे, पठाण यांनी मुंबई महामार्गावरील साई श्रद्धा हॉटेलजवळ मध्यरात्री सव्वा एक वाजता सापळा रचला.
या पथकाने औरंगाबादकडे येणारे टाटा मिनी टेम्पो (एमएच २०, बीई ०८८६) आणि लोडिंग अ‍ॅपेरिक्षा (एमएच २१, एक्स ०८९३) ही दोन वाहने थांबविली. मिनी टेम्पोचा चालक शेख इब्राहिम शेख खुदबोद्दीन (२५, रा. अलमगीर कॉलनी) आणि शेख वसीम शेख गफार (२८, रा. दलालवाडी) तसेच अ‍ॅपेचा चालक आमेर खान मोहंमद खान (३०, रा. कबाडीपुरा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आपल्या वाहनांमध्ये गुटखा असल्याची कबुली चालकांनी दिली. अन्वरशेठ, सिराजशेठ, फईमशेठ व सुरेशशेठ यांच्या मालकीचा हा गुटखा असल्याचे त्यांनी सांगितले. पोटूळ गावातील अन्वरशेठ याच्या फार्महाऊसवरून हा गुटखा आणला असून, तेथे आणखी साठा असल्याची माहिती चालकांनी दिली.
४पोलिसांनी एका चालकास सोबत घेऊन पोटूळ येथील अन्वर शेठचे फार्महाऊस गाठले. तेथील कर्मचारी शेख सादिक याच्याकडे विचारणा केली असता, फार्महाऊसमधील महिंद्रा पिकअप व्हॅनमध्ये (एमएच २१, एक्स ७२८९) गुटख्याच्या दोन गोण्या, तर फार्महाऊसमधील खोलीत आणखी गुटखा असल्याचे त्याने सांगितले.
४त्याचवेळी पिकअप व्हॅनमध्ये चालक शेख नदीम शेख लाल (२८, रा. बुढीलाईन) हा गुटखा भरत असलेला आढळून आला. खोलीची झडती घेतली असता, गुटख्याचा आणखी साठा दिसून आला. पोलिसांनी गुटखा भरलेली तिन्ही वाहने दौलताबाद ठाण्यात जमा केली.
बंदी असतानाही शहर व जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री होत असते. गुटख्याची अवैध वाहतूक व साठ्यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभागास आहेत.
४या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने अन्न व औषधी खात्याच्या सहआयुक्तांना पत्र लिहून आपल्या कारवाईची माहिती दिली. अन्न व औषधी खात्याच्या तक्रारीवरून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Gutkha in farm house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.