पोलिसांचा छापा पडूनही गुटखा विक्री सुरूच

By Admin | Updated: June 9, 2014 01:13 IST2014-06-09T00:37:06+5:302014-06-09T01:13:06+5:30

वसमत: येथील गढी मोहल्ला भागात गुटखाच्याच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी पाच लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र गुटख्याचा व्यवसाय पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे.

Gutkha continued to sell after police raided | पोलिसांचा छापा पडूनही गुटखा विक्री सुरूच

पोलिसांचा छापा पडूनही गुटखा विक्री सुरूच

वसमत: येथील गढी मोहल्ला भागात गुटखाच्याच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी पाच लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र गुटख्याचा व्यवसाय पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे. गुटख्याच्या व्यवसायातील मुख्य सुत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने तो पुन्हा जोमाने गुटखाविक्री करत असल्याचे चित्र आहे.
वसमत शहरात पूर्णा येथील कुख्यात गुटखा व्यावसायिकाने गुटखा साठवणूक व वितरण केंद्र सुरू केले. या गोदामावर रेल्वेमार्गे येणारा गुटखा साठवून तो नांदेड- हिंगोली- परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाठवला जात असतो. या व्यवसायासाठी पूर्णा व परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांच्या टोळ्याही तैैनात करण्यात आल्या आहेत. गढी मोहल्ला भागात रात्री उशिरा गुटखा उतरतो. दररोज हा प्रकार घडतो; परंतु आजवर वसमत पोलिसांनी या वाहनांची कधी तपासणी करण्याची हिम्मत मात्र दाखवली नाही, हे विशेष.
या दुर्लक्षामुळेच वसमत गुटखा विक्रीचे व साठवणुकीचे सर्वांत मोठे केंद्र होवून बसले आहे. गुटखा बंदी झाल्यापासून वसमतमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. जवळपास ५० ते ६० फेरीवाले शहरातील मुख्य रस्त्याने फिरून प्रत्येक पानपट्टी, हॉटेल, दुकानांवर गुटखा पोहचवत असतात. शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेले जर्दा विक्री केंद्राच्या माध्यमातूनही गुटख्याची राजरोस विक्री होत आहे. जर्दा विक्री केंद्राच्या मिनी टेम्पोंच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात गुटखा जात आहे. मात्र आजवर कधीच पोलिसांच्या तपासणीत हा गुटखा सापडला नाही. पोलिसांचे दुर्लक्ष गुटख्याच्या व्यवसायाला बळ देत असल्याचा आरोप सर्वच जण करीत आहेत. गुटखा विक्रेते गुटख्याच्या विरोधात छापा पडणार नाही, अशी व्यवस्था केल्याची ग्वाही देत असतात. गेली वर्षभर तरी हे सत्य ठरत होते. दोन दिवसांपूर्वी हिंगोलीच्या एलसीबी पथकाने मात्र छापा मारून मोठा साठा जप्त केला. या कारवाईत चार जणांना पोलिसांनी अटकही केली होती. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत. यात आरोपी शेख चाँद व शेख सिराज (दोघे रा.पूर्णा )हे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पूर्णा येथील गुटखा विक्रीचा व्यवसाय करणारेच वसमत येथे गुटखा विक्रीसाठी तळ ठोकून असल्याचेच यावरून दिसत आहे.
वसमत पोलिस या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुटखाविक्री व्यवसायातील साखळी व या व्यवसायास पाठबळ देणारांची नावे निष्पन्न करतात की नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे. पोलिस हे आरोपी शोधून त्यांना अटक करतात की, आरोपी ‘हजर’ होण्याची वाट पाहतात, यावरच गुटखा व्यवसायाच्या समुळ उच्चाटनाची दिशा ठरणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Gutkha continued to sell after police raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.