२९ लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: April 8, 2017 23:20 IST2017-04-08T23:19:27+5:302017-04-08T23:20:33+5:30
कळंब : गुटखा वाहतूक करणारी दोन वाहने पकडून पोलिसांनी २९ लाख रुपयांचा गुटखा शुक्रवारी जप्त केला.

२९ लाखांचा गुटखा जप्त
कळंब : गुटखा वाहतूक करणारी दोन वाहने पकडून पोलिसांनी २९ लाख रुपयांचा गुटखा शुक्रवारी जप्त केला. या गुटख्याचे बाजारमुल्य एक कोटीच्या घरात असल्याने शहरात गुटखा माफिया पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ७ एप्रिल रोजी शहराशेजारील ढोकी रोडवरील साई पेट्रोलपंपाजवळ परराज्यातील कँटर संशयितरित्या उभा असल्याचे व त्यामध्ये गुटखा असल्याची माहिती कळंब पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तातडीने धाव घेऊन या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात मागील बाजूस कॅरेट तर समोर गुटख्याच्या गोण्या असल्याचे आढळून आले. यानंतर हे वाहन गुटख्यासह पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याच दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील बसस्थानक परिसरात एका जीपमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यातही गुटखा आढळून आला. त्यामुळे हे वाहनही पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आले.
शनिवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी ए. एल. महाजन यांनी कँटर (क्र. टीएस०८/ यूबी ६५७६) यातील गुटख्याची तपासणी करून पंचनामा केला. यामध्ये विविध कंपन्यांचा २५ लाख रुपयांचा गुटखा असल्याचे तपासणीअंती समोर आले. जीपमध्ये (क्र. एमएच २५/ पी ४६५२) मध्ये तीन लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. अन्न व औषध विभागाने हा गुटखा वाहनासह जप्त केला. या प्रकरणात दोन वाहनांसह जवळपास ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने गुटखा बंदीनंतर पोलिसांनी प्रथमच मोठी कार्यवाही केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.