गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
By Admin | Updated: July 12, 2014 01:14 IST2014-07-12T00:04:20+5:302014-07-12T01:14:04+5:30
लातूर : भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे़ पूर्वीच्या काळात अगदी राजघराण्यातील राजकुमारासही ज्ञानार्जनासाठी ऋषी-मुनींकडे अरण्यात रहावे लागायचे़
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
लातूर : भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे़ पूर्वीच्या काळात अगदी राजघराण्यातील राजकुमारासही ज्ञानार्जनासाठी ऋषी-मुनींकडे अरण्यात रहावे लागायचे़ इतके महत्व गुरुंना होते़ काळ बदलला तसे ज्ञानशाखा बदलल्या़ परंतु, गुरु-शिष्याच्या नात्यातील तो ओलावा मात्र अजूनही कायम आहे़ जो आदर गुरुंविषयी पूर्वी होता तो आजही आहे़ याचीच काही प्रतिकात्मक उदाहरणे गुरुपौर्णिमेनिमित्त मांडत आहोत़़़
पंकज जैैस्वाल ल्ल लातूर
बनारस घराण्याचे खलीफा तबलासम्राट पंडित शारदा सहाय यांचे शिष्य तालमणी डॉ़राम बोरगावकर यांनी अविरत संगीत साधनेव्दारे गुरू-शिष्य परंपरा जोपासत लातुरातही मोठा शिष्य परिवार घडविला आहे़
संगीत क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे़ गुरूपौर्णिमेच्या पूर्व संध्येला डॉ़राम बोरगावकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, वयाच्या १६ व्या वर्षी १९७८ मध्ये आपण बनारस येथे जाऊन पं़शारदा सहाय यांच्याकडे तबल्याचे धडे गिरविले़ साडे तीन वर्ष तेथे राहिल्या नंतर पुढील अडीच तप लातूरहून बनारसला ये-जा करीत तबला वादनाचे शिक्षण घेतले़ बनारसी घराण्याच्या गायकीचे बोल व तेथील ताल विद्या गुरूंनी शिकवीली़ माझे गुरू पं़शारदा सहाय सध्या अमेरीकेत वास्तव्यास आहेत़ तबल्याच्या डाव्य डग्ग्यावर विशेष प्रभुत्व असणे ही बनारस घराण्याची ख्याती जगभर ओळखली जाते़ इतर संगीत घराण्यांपेक्षा बनारसी घराण्याचा बाज वेगळ्या ढंगाचा असतो़ प्रत्येक गुरूपौर्णिमेला लातुरातही बनारसी घराण्याची संगीत साधना नित्यनेमाने केली जाते, असेही डॉ़राम बोरगावकर यांनी सांगितले़ माझे गुरू पं़शारदा सहाय यांच्याकडे तबला वादनाची साधना करताना बारा-बारा तास अखंड रियाज व्हायचा, असेही ते म्हणाले़ पूर्वीच्या काळी गुरूगृही जावून त्यांची सेवा करून संगीताचे धडे घ्यायची परंपरा असायची़ बनारस मध्ये आजतागायत अशी संगीत परंपरा सुरू आहे़
संगीत शिक्षणासाठी पाणमळा विकला़़़
माझे आजोबा संगीत महर्षी बाबा बोरगावकर यांनी त्या काळी बोरगाव येथील पानमळा व पाण्याची विहीर असलेली शेती विकून मला बनारस येथे संगीत शिक्षणासाठी पाठविले़ बाबांनी नाट्य गिते व संगीत नाटकाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात स्वत:चा नावलौकीक केला होता़ त्यांना मुंबई येथील अजान मिस्त्री यांच्या स्वर साधना समितीच्या वतीने बाबा बोरगावकरांना संगीत महर्षी किताब देण्यात आला होता़ लातूरचे नाव संगीत क्षेत्रात उंचावण्याचे काम तू करावेस असा आशिर्वाद त्यांनीच दिला होता़ सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून बाबांचे स्वप्न पुर्ण करण्याचा आपला अटोकाट प्रयत्न असल्याचे तालमनी डॉ़राम कमलाकर बोरगावकर यांनी सांगितले़
तात्यांच्या अभिनयाने पाजले ‘बाळ’कडू...
दत्ता थोरे ल्ल लातूर
तात्या... श्रीराम तात्या... परि या सम हाच प्रमाणे त्यांच्यासारखे तेच. त्यांच्यासारखा नाट्यवेडा कुणी आणि माझ्यासारखा तात्यावेडा कुणी नाही. तात्यांची नाटके ऐन भरात असताना मला नाटकाचे वेड लागले. बाळकृष्णच्या अंगात नाटकाचे बाळकडू नाटकाचा न माहित नसतानाही केवळ तात्यांना नुस्ते रंगमंचावर पाहून माझ्यासारख्या एकलव्य शिष्याला मिळाले आणि पुढे रक्तात असे भिनले जसे तात्यांच्या अंगात नाटक , अशा शब्दात रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी आपल्या भावना मांडल्या.
ते पुढे म्हणाले, कॉलेजला असतानाच श्रीराम गोजमगुंडे यांच्यातला नाटकाचा ‘तात्या विंचू’ मला डसला. तात्यांची क्रेझ एवढी की जवळ जायलाही मिळायचे नाही. त्यांच्यासोबत कायम भलामोठा लवाजमा असायचा. त्यांच्यासोबत नाटक करायला तर तोबा गर्दी. त्यात मी अगदीच ‘बाळ’. ते अभिनय करतात... दिग्दर्शन करतात... नाटक बसवतात.. त्याचे विलक्षण आकर्षण होते. तस्सेच करायचे आणि व्हायचे हे मनात मात्र खूणगाठ बांधली आणि कामाला लागलो. एक एक एकांकिका बसवताना तात्यांच्याच नाट्यशैैलीला अंगिकारले. तसाच अभिनय केला. दिग्दर्शन आणि लवाजमा बाळगायलाही शिकलो. ८२ ला मराठवाडा विद्यापीठाला मी ‘लाल मुंग्या चावत नसतात’ घेऊन गेलो. माझ्या समोरच्या स्पर्धकांनी तात्यांनी बसविलेले ‘गमभनं’ आणलेलं कळालं. पण बक्षीस मला मिळालं. तात्यांनी माझं खूप कौतुक केलं.
जेव्हा तात्यांना पाहतो, तेव्हा नतमस्तक होतो . माझा गुरूच माझ्यासाठी अनमोल आहे. जेव्हा मला कुणी घरचे, बाहेरचे विचारायचे... तुझं कुलदैवत कोणतं तर माझ्या तोंडातून आजही शब्द बाहेर पडतात.... श्रीराम गोजमगुंडे ! या माझ्या जवळ जाऊन न शिकलेल्या पण दुरून शिकूनही कायम काळजाजवळ राहीलेल्या गुरुला गुरुपौैर्णिमेनिमित्त माझे शतश: नमन.
शिष्य चालवतोय गुरुंचा वारसा...
हणमंत गायकवाड ल्ल लातूर
पुस्तक माणसाचं मस्तक... पुस्तकसंपन्न मस्तक कुणाचंही हस्तक होत नसतं... हस्तक नसलेल्या मस्तकापुढे सर्वजण नतमस्तक होत असतात... असा पुस्तकसंपन्न गुरु आज मिळणं मुश्किलीचे आहे. गुरु-शिष्यांच्या कृती आणि उक्तीत फरक पडत आहे. परंतु, याला अपवाद असलेली गुरु-शिष्यांची जोडी लातुरात आहे. प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार आणि प्राचार्य डॉ. वामनराव पाटील ही गुरु-शिष्यांची जोडी लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श अशीच आहे.
१९७६ पासून गुरु-शिष्यांची ही परंपरा शिष्य प्राचार्य झाल्यानंतरही कायम आहे. शिष्य दयानंद कला महाविद्यालयाचा प्राचार्य तर गुरु महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात दीर्घकाळ प्राचार्य राहिले. गुरु डॉ. नागोराव कुंभार सरांचा प्रभाव शिष्य असलेल्या प्राचार्य डॉ. वामनराव पाटलांवर. साधी राहणी, प्रामाणिकपणा, शिकवण्याची पद्धत, मितभाषी स्वभाव, आचार आणि विचार सगळं काही गुरु डॉ. कुंभार सरांकडूनच घेतलं. या गुणांचा आवर्जून उल्लेखही डॉ. पाटील करतात. डॉ. कुंभार सर नसते तर प्राचार्य वामन पाटील झालेच नसते, अशी कृतज्ञताही ते व्यक्त करतात. १९७६ ला बी.ए. तृतीय वर्षासाठी बसवेश्वर महाविद्यालयात सरांमुळे प्रवेश घेतला आणि त्यांनीच कोल्हापूर, पुणे येथे एम.ए. तत्वज्ञान विषयाच्या प्रवेशासाठी प्रयत्न केला. केवळ प्रयत्न केला नाही तर राहण्याची सोयही पुणे येथे सरांमुळेच झाली. स्वत:च्या गुरुंकडे शिष्याला पाठविणारा एकमेव गुरु डॉ. नागोराव कुंभार सर असतील. माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम केलं. नोकरी लागेपर्यंत सरांनी किती पैसे दिले असतील, त्याची मोजदादही नाही. विद्यार्थी हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदूच. आजच्या या युगात असा गुरु मिळणे अवघड आहे. परंतु, सरांसारखे अनुकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो, असे प्राचार्य डॉ. वामन पाटील यांनी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले.
नाथ संस्थानला गुरु परंपरेचा वारसा
रमेश दुरुगकर ल्ल औसा
मराठवाड्याच्या संत भूमीत लातूर जिल्ह्यात श्री सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान हे अद्वैत धर्म प्रसारक पीठ आहे़ महाराष्ट्राबरोबरच आंध्र आणि कर्नाटकातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणून नाथ संस्थान नावाने ओळखले जाते़ २४१ वर्षांपूर्वी भागवत धर्म प्रसारासाठी सद्गुरु गुरु गुंडा महाराजांच्या आज्ञेने नाथ पीठाचे अद्यपुरुष वीरनाथ महाराज यांनी या कार्याची सुरुवात केली़ या परंपरेतील पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर होत़ या संस्थानला गुरु परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे़
औसा नाथ संस्थानची ओळख म्हणजे गुरु प्रासादीक चक्री भजन होय़ ही दिव्य साधना अद्यपुरुष सद्गुरु वीरनाथांना त्यांच्या एकनिष्ठ गुरु भक्तीमुळे सेवा फलस्वरूप लाभली़ त्यानंतर द्वितीय सत्पुरुष श्री सद्गुरु मल्लनाथ महाराज, तिसरे सत्पुरुष सद्गुरु श्री दास वीरनाथ महाराज, चौथे पीठाधिश सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी ती जोपासली, वाढविली़ विद्यमान पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसकर यांनी १९८५ मध्ये गुरुपिता सद्गुुरु ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून गुरु परंपरेच्या गादीची सेवासुत्रे घेतली़ चक्रीभजन ही उपासना सर्वसामान्य वारकऱ्यांपासून ते उच्च शिक्षित विज्ञाननिष्ठ पिढीतील प्रत्येकाच्या अंत:करणापर्यंत पोहोचली़ देशाबरोबरच अमेरिकेतही औसेकर महाराजांच्या या पावन प्रासादिक चक्रीभजनाचा प्रसार केला जात आहे़ नामभक्ती, गुरुसेवा, सदाचरण, नीतीमुल्ये, धर्मसंस्कार, अद्वैत भक्ती तत्वाची रूजवन सद्गुरु श्री गुरुबाबा महाराजांनी केली आहे़
नाथ संस्थानचा शिष्यवर्गही मोठ्या प्रमाणात आहे़ त्यांचा गुरु शिष्य हा भक्ती ऋणानुबंध काम ठेवण्यासाठी श्री गुरुबाबा महाराजांना त्यांचे ज्येष्ठ बंधू सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर तेवढ्याच निष्ठेने सहयोग देतात़
एक हजार शिष्यांना दिली नृत्य निपुणता...
हरी मोकाशे ल्ल लातूर
भरतनाट्यम् नृत्यास गेल्या २ हजार वर्षांपासूनची परंपरा आहे़ ही परंपरा लातुरात जोपासण्याचे व तिचा प्रसार करण्याचे कार्य नभा भास्कर बडे ह्या करीत आहेत़ भरतनाट्यम्चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आपले नृत्य सादर करुन गुरुपौर्णिमेदिवशी आगळी- वेगळी दक्षिणा देत असतात़ बडे यांच्याकडे आजपर्यंत किमान १ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी नृत्यात पारंगत झाल्या आहेत़
दोन हजार वर्षांपासूनची परंपरा असलेले भरतनाट्यम् नृत्य हे भारतातील तामिळनाडूतील आहे़ ५ वा वेद हा नाट्यवेद असून त्यात विविध नृत्यांविषयी माहिती आहे़ भरतनाट्यम्ला विशेष महत्त्व आहे़ हा नृत्य प्रकार पूर्वी मंदिरात सादर केला जात असे़ मिनाक्षी सुंदरम् पिल्ले, बाला सरस्वती यांनी या नृत्य प्रकाराचा समाजात प्रसार केला़ त्यामुळे आज मोठमोठ्या शहरांमध्ये हे नाट्य शिकविले जात आहे़
लातुरातील नभा भास्कर बडे यांनी त्यांच्या नृत्य कौशल्याच्या माध्यमातून मागील १५ वर्षांत एक हजारावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना या कलेत निपुण केले आहे़
गुरू-शिष्यांनी गाजविला फड
महेश पाळणे ल्ल लातूर
क्षेत्र कोणतेही असो, त्या-त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्तम गुरू मिळणे महत्वाचे असते़ त्याचेच फलीत शिष्यामध्ये दिसून येते़ क्रीडा क्षेत्रात तर गुरूला अनन्य साधारण महत्व आहे़ गुरूच्या प्रात्यक्षिकातूनच शिष्याची घडण होत असते़ कुस्ती अन् लातूरची नाळ तशी जुनीच़ कै़हरिश्चंद्र बिराजदार व काका पवार या गुरू-शिष्यांची जोडी जगभर प्रसिध्द आहे़ नव्याने भारतीय कुस्ती संघात समावेश झालेल्या लातुरच्या शैलेश शेळकेचे गुरू काका पवार त्यामुळे ही साखळी पुढे चालू राहणार यात शंका नाही़
औसा तालुक्यातील टाका हे मूळ गाव असणाऱ्या शैलेश शेळकेची नुकतीच जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेसाठी (१८ वर्षा खालील) भारतीय संघात निवड झाली आहे़ या स्पर्धा १४ ते २१ जुलै दरम्यान स्लोव्हाकियातील स्निना येथे होणार आहेत़ यापूर्वी शैलेशने ८४ किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते़
खाशाबा जाधव स्पर्धा व राष्ट्रीय शालेय स्पर्धेत शैलेशने कुस्तीचा आखाडा गाजवीत रौप्य पदक पटकाविले़ पुण्यात सरावासाठी गेलेल्या शैलेशने सुरूवातीस कुस्तीचे धडे गिरवीण्यास सुरूवात केली़ त्यानंतर काका पवारांच्या तालमीत गेल्यावर शैलेशच्या कुस्तीला पकड मिळाली़ ग्रिकोरोमन प्रकारात काकांच्या मार्गदर्शनाखाली शैलेशने सुवर्णपदक पटकाविले़ या जोरावरच त्याची भारतीय संघात निवड झाली़ काकांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकिवण्याचे आपले स्वप्न असल्याचे शैलेशने सांगितले़ कुस्तीतले बारकावे तसेच उत्कृष्ट कौशल्य गुरूंमुळेच साकाराल्याचेही त्यांनी सांगितले़
काकांनी शिष्य शैलेशची पाठराखत केवळ भारतीय संघात स्थान मिळवीणे यावर थांबायचे नसून या स्पर्धेत पदक मिळवून आणण्याचे गरजेचे सांगून आॅलम्पिक स्पर्धेत शैलेशने सहभागी व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली़ माझे गुरू रुस्तुम-ए-हिंद कैै. हरिश्चंद्र बिराजदार यांच्यामुळेच मी घडलो हीच शिकवण मी भावी पिढीसाठी चालू ठेवली आहे़ गरीबीवर मात करीत शैलेशने मिळवीलेले यश इतर मल्लांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगून गुरू-शिष्याच्या या नाते संबंधी आदरता व्यक्त केली़