गुरुजींची धावपळ !
By Admin | Updated: September 4, 2014 01:26 IST2014-09-04T00:59:07+5:302014-09-04T01:26:02+5:30
भालचंद्र येडवे , लातूर शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची शाळांना सक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची दूरदर्शन, रेडिओ संचाची

गुरुजींची धावपळ !
भालचंद्र येडवे , लातूर
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची शाळांना सक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची दूरदर्शन, रेडिओ संचाची जमवाजमव करण्यात दमछाक होत आहे. ज्या शाळांत वीज, इंटरनेट जोडणी नाही, अशा शाळांतील गुरुजींना तर शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांची दारे ठोठावण्याची वेळ आली आहे. परिणामी, शिक्षक दिनाच्या उत्सवावर एकप्रकारे विरजनच पडले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील मुला-मुलींना आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गुणवत्तावाढीसाठी ज्ञानदानाव्यतिरिक्त अन्य कामांतून शिक्षकांना मुक्तही केले आहे. परंतु, आता पंतप्रधान कार्यालयातून शिक्षक दिनी त्यांचे भाषण ऐकण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षक दिन साजरा करावा की पंतप्रधानांचे भाषण ऐकावे, असा प्रश्न गुरुजींसमोर पडला आहे. भाषण ऐकण्यासाठी टीव्ही संच आणि रेडिओची सोय न केली तर कारवाईचा ससेमिरा मागे लागेल, अशी भीतीही गुरुजींना वाटत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव काही शाळांनी टीव्ही, रेडिओ संचाची सोय केली आहे, तर काही शाळा तयारीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त देशभरातील शालेय विद्यार्थ्यांशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी २८ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत अस्तित्वात असलेल्या २४९२ शाळांमध्ये ४ लाख १६ हजार ५२१ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात.
शालेय शिक्षण विभागाच्या सूचनानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे व विभागीय शिक्षण उपसंचालक व्ही.के. खांडके यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आपापल्या विभागातील शाळांमध्ये दूरदर्शन संच, रेडिओ व जनरेटरची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या. प्रशासन, मुख्याध्यापक, स्थानिक व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्यात १६९२ शाळांमध्ये दूरदर्शन संच, तर ८०० शाळांमध्ये रेडिओची व्यवस्था करण्यात येत आहे. यात गुरुजींचाच वेळ जात आहे.
जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ९१२ विद्यार्थी दूरदर्शन तर १ लाख ६६ हजार ६०९ विद्यार्थी रेडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकणार आहेत. परंतु, शिक्षक दिनाचे काय? हा यक्ष प्रश्न तर आहेच. शिवाय, तालुका व जिल्हास्तरावर अनेक गुणवान शिक्षकांना पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षक दिनीच त्याचे वितरण आहे. पंतप्रधानांचे भाषण असल्यामुळे पुरस्कार घ्यायला जावे की न जावे, असाही प्रश्न पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पडला आहे.
एकंदरीत लातूर जिल्ह्यातील २४९२ शाळांमधील ४ लाख १६ हजार ५२१ विद्यार्थी शिक्षक दिनी दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत पंतप्रधानांच्या भाषणाचा लाभ घेतील, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. प्रत्यक्षात किती शाळांमध्ये आज रोजी दूरदर्शन, रेडिओ व वीज जोडणी उपलब्ध आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्याची सक्ती असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेनुसार शाळा-शाळांमध्ये दूरदर्शन संचासह रेडिओ, इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना भाषण ऐकवावे, असे कळविण्यात आले आहे. शिक्षक दिनी पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची तयारी, तर दुसरीकडे याच दिनी जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाची तयारी करण्यात शिक्षण विभागाची दमछाक उडाली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनानुसार पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थितरित्या पार पाडण्याबाबत संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे व विभागीय शिक्षण उपसंचालक व्ही.के. खांडके यांनी केले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये दूरदर्शन संच व रेडिओची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्रा.) शंकरराव वाघमारे व माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिली.