रणरणत्या उन्हातही गुरुजींची वारी निघाली विद्यार्थ्यांच्या दारी...
By Admin | Updated: May 12, 2015 00:52 IST2015-05-12T00:06:15+5:302015-05-12T00:52:44+5:30
बीड : नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. सुट्यांचा आनंद घेण्याऐवजी गुरूजींना पुढील वर्षातील विद्यार्थी संख्येसाठी घरोघरी भटकावे लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

रणरणत्या उन्हातही गुरुजींची वारी निघाली विद्यार्थ्यांच्या दारी...
बीड : नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. सुट्यांचा आनंद घेण्याऐवजी गुरूजींना पुढील वर्षातील विद्यार्थी संख्येसाठी घरोघरी भटकावे लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात २९३१ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. इंग्रजी शाळा मोठमोठ्या जाहिराती करून विद्यार्थी आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांसमोर स्वत:च्या नौकरीचा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच मराठी शाळांपुढे विद्यार्थी संख्या वाढविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे नियमानुसार विद्यार्थी संख्या राहिली नाही तर आपण अतिरिक्त ठरू याची भीती शिक्षकांना वाटू लागली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन नवीन विद्यार्थी शोधण्याचे काम शिक्षक करत असल्याचे चित्र आहे.
विश्वास संपादनाचे आव्हान
शिक्षक घरोघरी जाऊन पालकांची भेट घेऊन त्यांना आपल्या शाळेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या पालकांची परिस्थिती जेमतेम आहे त्यांची मुले मराठी शाळेत पाठविण्यास तयार होत आहेत.
मोजक्याच शाळेत भरपूर विद्यार्थी
शहरातील मोजक्याच खासगी व मराठी शाळांमध्ये भरपूर विद्यार्थी संख्या दिसते. अतिरिक्त ठरायचे नसेल तर विद्यार्थी आणल्याशिवाय पर्याय नाही, असे संस्थाचालकांकडूनही शिक्षकांना सांगितले जात आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्याऐवजी शिक्षकांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)