प्राथमिक शाळांवरील गुरूजींची १३० पदे वाढली !
By Admin | Updated: April 1, 2015 00:58 IST2015-04-01T00:53:41+5:302015-04-01T00:58:14+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने भेडसावत आहे. निमशिक्षकांच्या प्रश्नामुळे तर शिक्षण विभाग कोंडीत सापडला आहे.

प्राथमिक शाळांवरील गुरूजींची १३० पदे वाढली !
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने भेडसावत आहे. निमशिक्षकांच्या प्रश्नामुळे तर शिक्षण विभाग कोंडीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरा संच मान्यतेकडे लागल्या असतानाच शासनाने वाढीव पदांची संख्या शिक्षण विभागाला कळविली आहे. त्यानुसार किमान १३० पदे वाढत असल्याने आता अतिरिक्त गुरुजींचा प्रश्न सुटणार आहे. असे असले तरी प्रशालेच्या संचमान्यतेची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे. त्यातच निमशिक्षकांची भर पडली. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची कोंडी अधिक घट्ट बनली. शासन निर्णयानुसार नियुक्त्या देण्यात याव्यात, यासाठी निमशिक्षकांकडून मागील चार-पाच महिन्यांपूर्वी तब्बल दोनवेळ उपोषण करण्यात आले. शिक्षण विभागाकडून ‘संच मान्यता आल्यानंतर नियुक्ती देऊ’ असे आश्वासन त्या-त्या वेळी देण्यात आले. मध्यंतरी निमशिक्षक नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशीअंती सदरील प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला होता. हाच मुद्दा पकडत निमशिक्षकांनी १६ मार्च पासून आंदोलन केले. याहीवेळी शिक्षकांना ‘संच मान्यता आल्यानंतर नियुक्ती देऊ’ असे आश्वासन दिल्यानंतर जवळपास चार-पाच दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले.
दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांसोबतच शिक्षण विभागालाही संच मान्यतेची प्रतीक्षा लागली होती. जिल्हा परिषदेकडून याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तातडीने वाढीव पदांची संख्या सादर करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक शाळांवरील १३० पेक्षा अधिक गुरुजींच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे आता नियमित अतिरिक्त शिक्षकांसोबतच निमशिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, सदरील अहवालामध्ये ३ शाळांना एकही पद मान्य करण्यात आलेले नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून शासनाला कळविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित शाळांवर विद्यार्थी संख्याही बऱ्यापैकी असल्याने वाढीव पदांची संख्या १३० पेक्षा अधिक होऊ शकते, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)