गुलमंडी सेनेला; राजाबाजार भाजप
By Admin | Updated: April 1, 2015 01:07 IST2015-04-01T00:25:26+5:302015-04-01T01:07:53+5:30
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना- भाजप युतीची दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली बैठक अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेली नाही.

गुलमंडी सेनेला; राजाबाजार भाजप
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना- भाजप युतीची दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली बैठक अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेली नाही. उद्या बुधवारी दुपारपर्यंत युतीतील जागा वाटपाचा निर्णय होईल, असे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. वॉर्डांच्या अदला-बदलीसाठी शिवसेनेची तयारी असून गुलमंडी सेनेकडे, तर राजाबाजार भाजपकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गुलमंडीच्या मोबदल्यात नक्षत्रवाडी, राजाबाजार, एन-६, मयूरपार्क भाजपकडे जाऊ शकेल.
जागावाटपाचा मुख्य मुद्दा गुलमंडी, राजाबाजार हे वॉर्डच होते; परंतु त्या दोन्ही वॉर्डांबाबत तोडगा निघाला असून, आणखी दोन वॉर्डांवरून उद्या बुधवारी चर्चा होणार आहे.
युतीमध्ये समान जागावाटप झाले नाही तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय दोन्ही पक्ष घेऊ शकतात, अशीही चर्चा कानावर आली आहे. बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची ‘बॉडी लँग्वेज’ युती करण्यासारखी नव्हती, असेही सूत्रांकडून समजले आहे.
भाजपकडून वॉर्ड अदलाबदल करण्यासाठी काही मागण्या पुढे आल्या आहेत. सेना लढणार असलेले ‘अ’ श्रेणीतील वॉर्ड भाजप मागत आहे. त्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे निर्णय घेणार आहेत. कारण भाजपच्या प्रचार कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी सुरू झाल्या.
बुधवारी रात्री युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. त्यानंतर युती होण्याचा मार्ग मोकळा होईल. भाजपला ११३ वॉर्डांतून मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला, तर युती होणार नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. पूर्व मतदारसंघातील काही वॉर्डांची मागणी भाजपने केली आहे. त्यावर बुधवारी निर्णय होईल, असे समजते.
जैस्वाल संतापून परतल्याची चर्चा
महानगरप्रमुख माजी आ. प्रदीप जैस्वाल हे शिवाजीनगर, राजाबाजार हे वॉर्ड भाजपला सोडण्यात आल्यामुळे संतापून मुंबईतून परतल्याची अफवा सेनेच्या गोटात पसरली. राजाबाजार हा वॉर्ड सेनेकडून भाजपच्या गोटात गेला आहे. त्यापाठोपाठ शिवाजीनगरही दिला गेल्यामुळे जैस्वाल संतापल्याची चर्चा होती.
दरम्यान, जैस्वाल शहरात आल्यावर त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, तसे काहीही घडले नाही. शिवाजीनगर सेनेचा विद्यमान वॉर्ड आहे. त्यावर तर साधी चर्चाही झालेली नाही. कुणीतरी मुद्दामहून गैरसमज निर्माण होण्याच्या अनुषंगाने माहिती पेरली आहे. युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करूनच होणार आहे.