नियम मोडणाऱ्यांना गुलाब पुष्प
By Admin | Updated: September 11, 2014 00:02 IST2014-09-10T23:47:00+5:302014-09-11T00:02:36+5:30
परभणी: रस्त्यावरुन जाताना वाहतुकीचा नियम मोडला की पावतीबुक घेऊन दंड लावणारा पोलिस कर्मचारी आपण नेहमीच पाहतो.

नियम मोडणाऱ्यांना गुलाब पुष्प
परभणी: रस्त्यावरुन जाताना वाहतुकीचा नियम मोडला की पावतीबुक घेऊन दंड लावणारा पोलिस कर्मचारी आपण नेहमीच पाहतो. परंतु बुधवारी मात्र नियम मोडणाऱ्यांना दंड न लावता गुलाब पुष्प देऊन ‘आता तरी नियमांचे पालन करा’ असा सबुरीचा सल्ला देत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गांधीगिरी केली. वाहतूक शाखेचा हा अनोखा प्रयोग दिवसभर चर्चेचा विषय बनला होता.
परभणी शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून वाहतूक शाखा कार्यरत आहे. चौका-चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी सेवेत असतात. मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची संख्या दिवसागणीक वाढतच चालली होती. दंड भरल्यानंतरही वाहनधारकांकडून तीच चूक परत केली जायची. त्यामुळे वाहनधारकांना शिस्त लागावी, शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांच्या सूचनेवरुन बुधवारी हा उपक्रम राबविण्यात आला
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शेख फसियोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, कच्छी बाजार, किंग कॉर्नर, गांधी पार्क, आर.आर. टॉवर आदी ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांना गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना नियम समजावून सांगितला व यापुढे नियम मोडणार नसल्याचे त्यांच्याकडून वदवून घेतले.
दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक शेख उस्मान, पो.कॉ.दीपक रवींद्र, काकडे, तिवार, डुकरे, पांचाळ, महेश पांगरकर आदींनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. (वार्ताहर)
साडेतीनशे फुले...
तीन तासांच्या या मोहिमेसाठी तब्बल साडेतीनशे गुलाबपुष्प लागले. यावरुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या किती अधिक आहे, याचा अंदाज येतो. या मोहिमेसंदर्भात बोलताना पोलिस निरीक्षक शेख फसियोद्दीन म्हणाले, नो एन्ट्री, टिबल सीट, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनधारकांना थांबवून त्यांना गुलाबाचे फुल देऊन समजावून सांगण्यात आले. तुमच्यासाठीच वाहतुकीचे नियम आहेत. नियम डावलल्याने एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? यात तुमचेच नुकसान आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, असे सांगितले. या मोहिमेस वाहनधारकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, या पुढे अशी चूक होणार नाही, असा शब्द अनेक वाहनधारकांनी दिल्याचे फसियोद्दीन यांनी सांगितले.