मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज

By Admin | Updated: May 16, 2014 00:11 IST2014-05-15T23:25:43+5:302014-05-16T00:11:11+5:30

जालना : लोकसभा निवडणूक २०१४ ची मतमोजणी शुक्रवारी औरंगाबाद रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात होणार असून तेथील तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Guidance was ready for counting | मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज

जालना : लोकसभा निवडणूक २०१४ ची मतमोजणी शुक्रवारी औरंगाबाद रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात होणार असून तेथील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस.आर.नायक यांनी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी यांनी प्रत्यक्ष भेटीत आढावा घेऊन संबंधितांना कामाबाबत सूचना दिल्या. या मतमोजणी कामासाठी ४०० अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांची सरमिसळ करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबल लावण्यात आले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जालना, भोकरदन, सिल्लोड आणि फुलंब्री तर दुसर्‍या मजल्यावर बदनापूर आणि पैठण विधानसा मतदारसंघातील मतमोजणीचे काम होणार आहे. पाच विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २२ फेर्‍या होणार असून बदनापूर मतदारसंघात मात्र २५ फेर्‍या होणार आहेत. तळमजल्यावर निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कार्यालय असणार आहे. आतील मोकळ्या जागेत माध्यम कक्ष आणि राखीव कर्मचार्‍यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात ३०० पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच केंद्रीय राखीव दलाचे जवान असणार आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलला एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. हे सूक्ष्म निरीक्षक केंद्र सरकारचे व राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी अधिकारी असणार आहेत. प्रत्येक फेरीनंतर निवडणूक निरीक्षकांच्या निर्देशानुसार सूक्ष्म निरीक्षक दोन मतदान केंद्राची पुन्हा रँडमली मतमोजणी करतील. प्रत्येक युनिटची मतमोजणी झाल्यानंतर कोणत्या उमेदवारास किती मते पडली यांची छायाकिंत प्रत देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचारी अधिकारी यांंनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवावयाचे आहे. शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या पूर्व बाजूच्या मोकळ्या जागेत सर्व अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार, पोलिस यांच्यासाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. माध्यम कक्षात पत्रकारांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माध्यम कक्षात संगणक, फॅक्स, इंटरनेट, फोन, टीव्ही, आदींची सोय करण्यात आलेली आहे. माध्यम कक्षापर्यंतच पत्रकारांना मोबाईल घेऊन जाता येणार आहे. माध्यम कक्षात केवळ राज्य निवडणूक आयोगाने ओळखपत्र दिलेल्या पत्रकारांनाच प्रवेश मिळणार आहे. असेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) मतमोजणीच्या पूर्वसंध्येला केंद्रीय निवडणूक निरीक्षक व्ही. श्रीरामा रेड्डी व जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गुरूवारी मतमोजणीची रंगीत तालिम केली. पूर्वतयारीची सर्व कामे पूर्ण झाल्याची खात्री त्यांनी करवून घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी व्यवस्था, निकाल संकलनासाठी आवश्यक व्यवस्था, सर्व स्ट्राँगरूमवर देखरेख, संकलन आदी कामांची रंगीत तालीम घेण्यात आली.

Web Title: Guidance was ready for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.