प्रशासनाचे गाऱ्हाणे अन मंत्रिमहोदयांची आश्वासने

By Admin | Updated: November 18, 2014 01:06 IST2014-11-18T00:38:12+5:302014-11-18T01:06:42+5:30

जालना : ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कामांवर भर दिला पाहिजे. जनतेला दैनंदिन सुविधा देण्याबरोबरच विविध विकास कामेही केली पाहिजे.

Guards of administration and promises of non-ministers | प्रशासनाचे गाऱ्हाणे अन मंत्रिमहोदयांची आश्वासने

प्रशासनाचे गाऱ्हाणे अन मंत्रिमहोदयांची आश्वासने



जालना : ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कामांवर भर दिला पाहिजे. जनतेला दैनंदिन सुविधा देण्याबरोबरच विविध विकास कामेही केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कामांचा, योजनांचा प्रस्ताव द्या, मी केंद्र किंवा राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळवितो, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दानवे यांनी सोमवारी तब्बल साडेपाच तास विभागनिहाय कामांचा आढावा घेतला. त्यावेळी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर ते बोलत होते. यावेळी जि.प. चे अध्यक्ष तुकाराम जाधव, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, सभापती शहाजी राक्षे, भगवानसिंह तोडावत, रामेश्वर सोनवणे, वसंत जगताप, संतोष लोखंडे, राजेंद्र देशमुख, भास्कर दानवे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
दुपारी १२.३० वाजता बैठकीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा दानवे यांनी आढावा घेतला. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने आतापासूनच ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ज्या गावांना टँकर हवे, ग्रामपंचायतींनी मागणी केल्यानंतरही ते लवकर का दिले जात नाही, असा सवाल करून दानवे यांनी असे प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची सूचना केली.
जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एल. तांगडे यांनी दिली. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जी कामे अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत उपविभागीय कार्यालये जिल्ह्यात ५ तालुक्यांमध्येच आहेत. बदनापूरसह गेल्या पंधरा वर्षात अस्तित्वात आलेल्या नवीन मंठा आणि घनसावंगी तालुक्यांमध्ये हे कार्यालय नाही, असा मुद्दा चर्चेत आल्यानंतर दानवे यांनी बदनापूर येथील कार्यालयाचा प्रस्ताव द्या, आपण शासनाकडून मंजुरी मिळवू असे सांगितले. जिल्ह्यात काही नवीन पंचायत समित्यांच्या इमारतींमध्ये काही विभागांच्या कार्यालयांसाठी जागा नाही, तेव्हा पहिल्या मजल्याच्या प्रस्तावासाठी शासनाकडून मान्यता घेण्यासंबंधीचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
६ डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्याअंतर्गत एक भाग म्हणून ६ डिसेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील एक मोठे गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले. यामध्ये ग्रामपंचात, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाअंतर्गत सुमारे २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा कामांवर परिणाम होत असल्याचे काही विभागप्रमुखांनी यावेळी सांगितले. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी रिक्त जागांची यादी माझ्याबरोबरच आमदारांकडे द्या. बहुतांश रिक्त जागा भरण्याचा आपण प्रयत्न करू असे सांगितले. रिक्त जागांमध्ये वर्ग-२ कर्मचाऱ्यांच्या सर्वाधिक शंभर जागांचा समावेश आहे. याशिवाय बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ३ उपकार्यकारी अभियंता, ३८ वैद्यकीय अधिकारी, २७ पशुधन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.
‘सिंचना’ चा डाग पुसून काढा
४जि.प. सिंचन विभागात काही वर्षांपूर्वी झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे संपूर्ण राज्यात या विभाग कार्यालयाला डाग बसला आहे. सर्वांनी मिळून तो डाग पुसणे आवश्यक आहे. या विभागामार्फत अधिकाधिक कामे प्रशासनाने करावीत. त्यासाठी आपण शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ, असे दानवे म्हणाले.
‘आॅनलाईन’ वरून दानवे संतप्त
४पंचायत विभागाच्या कार्याचा आढावा घेताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे यांनी ग्रामपंचायत पातळीवरही आता सर्व माहिती आॅनलाईन झाली असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आणखी काही मुद्दे सांगताना केंद्रे यांनी ‘आॅनलाईन’ चा सतत उल्लेख केला. त्यावर दानवे संतप्त झाले. ‘तुम्हाला या क्षणी मी दहा गावांत घेऊन जातो, तेथे ही आॅनलाईन सुविधा सुरू असल्याचे दाखवून द्या’ असे आव्हान देत संगणकाचे ज्ञान नसणाऱ्यांनाही त्यावर बसविले जाते, असे सांगून अनेक ग्रामपंचायतींमध्ये आॅनलाईन सुरूच झाले नसल्याचे दानवे यांनी सांगितले.
मग्रारोहयोअंतर्गत भोकरदन, जाफराबाद तालुक्यात झालेल्या कामांची यादी जेव्हा दानवे यांनी बघितली, तेव्हा बहुतांश कामांची कंत्राटदारांना देयके अदा झाली. मात्र त्याच कामांवरील मजुरांचा मोबदला अद्यापही देण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे दानवेंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जबाबदार बीडीओंविरुद्ध प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले. मजुरांना कामाचा मोबदला तातडीने द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
बचत गटांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घ्या
४जिल्ह्यात महिला बचत गटांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी देण्यासाठी बचत गटांचा महासंघ स्थापन होण्याबाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना दानवेंनी केली. बचत गटांच्या माध्यमातून तयार होणारे उत्पादन त्यांना विक्री करता यावे, यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते करावेत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

Web Title: Guards of administration and promises of non-ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.