जीटीएलच्या कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: October 11, 2014 00:39 IST2014-10-11T00:15:56+5:302014-10-11T00:39:27+5:30
औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे.

जीटीएलच्या कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात
औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जीटीएलकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जीटीएलने शहरातील वीजपुरवठ्याचा कारभार हातात घेतल्यानंतर उघड्यावरील विद्युत डीपींना सुरक्षा भिंती बाधण्याचे धोरण स्वीकारले होते. हे धोरण फक्त कागदावरच प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक विद्युत डीपींच्या सुरक्षा भिंतींची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास येते. नागरिक आणि डी.पी.च्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतींचा फायदा नसल्याचे स्पष्ट होत आहे. साईनाथ उद्यान येथील डी.पी.ला झाडांनी चारही बाजूंनी वेढल्यामुळे फक्त खांब दिसत आहेत. त्यामुळे येथे डी.पी. आहे का, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. डी.पी.मध्ये अचानक काही बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्त करणे शक्यच नाही. साईनाथ उद्यान महापालिकेचे आहे. मनपाही झाडांच्या कापणीकडे दुर्लक्ष करीत आहे. झाड आणि डी.पी. एकच झाल्यामुळे वीजपुरवठ्यामुळे बिघाड झाल्यास अडचण होऊ शकते. या भीतीपोटी आम्ही मुलांना उद्यानात खेळण्यासाठी जाऊ देत नाही, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे. जीटीएल किंवा मनपाने डी.पी.चा श्वास मोकळा करून परिसर तात्काळ स्वच्छ करावा, नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी अशोक बारवाल, संतोष कांबळे आदींनीकेली.